अनुमतीशिवाय गोपनीय फोटो शेअर केल्यास होणार कारवाई
ट्विटरप्रमाणेच मेटाने महिला सुरक्षेच्या दृष्टीने एक टूल आणले आहे. महिलांना ऑनलाइन ट्रोलिंगपासून यामुळे संरक्षण मिळणार आहे. या टूलद्वारे महिला आपली ओळख जाहीर न करता ट्रोल करणाऱ्यांची तक्रार करू शकतात. परवानगीशिवाय लैंगिक फोटो शेअर केला असल्यास फ्लॅग रेज करू शकतात. त्यानंतर फोटो आपोआप काढून टाकला जाईल. ज्या महिलांना इंग्रजी येत नाही त्यांनाही त्यांच्या स्थानिक भाषेत तक्रार करता येणार आहे. महिला फेसबुक आणि इंस्टाग्राम सारख्या प्लॅटफॉर्मवर स्थानिक भाषेत तक्रार करू शकतील. आता १२ भारतीय भाषांमध्ये ही सुविधा उपलब्ध आहे.
मेटा प्लॅटफॉर्मच्या संचालक (ग्लोबल सिक्युरिटी पॉलिसी) करुणा नैन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, मेटाच्या या उपक्रमामुळे महिलांना भाषेच्या कोणत्याही समस्यांना सामोरे जावे लागणार नाही. “तक्रार केल्यावर हा प्लॅटफॉर्म वापरकर्त्यांकडून त्यांचा फोटो घेत नाही. मात्र एका युनिक आयडीद्वारे विवादित पोस्टवर कारवाई केली जाते. फोटो अपलोड होताच फेसबुकचे ऑटोमॅटिक टूल्स ते स्कॅन करतात. मेटाने सेंटर फॉर रिसर्च (CSR) आणि रेड डॉट फाऊंडेशन सोबत भागीदारी केली आहे जेणेकरून त्यांच्या प्लॅटफॉर्मवर महिलांना सुरक्षा दिली जाईल.” असंही त्यांनी पुढे सांगितलं.