नागपूर: संपूर्ण राज्यात रंगपंचमीचा उत्साह शिगेला पोहोचलेला असतानाच ‘एमआयएम’ पक्षावरून महाविकास आघाडी आणि विरोधकांमध्ये शनिवारी चांगलीच धुळवड रंगली. ‘एमआयएम’ने राष्ट्रवादी काँग्रेसला युतीचा प्रस्ताव दिल्यानंतर राज्यात राजकीय बोंबाबोंब सुरु झाली.
‘भाजपला हरवायचेच आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसने ‘एमआयएम’ सोबत युती करावी’, असा प्रस्ताव खासदार इम्तियाज जलील यांनी शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे संपर्कमंत्री तथा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना दिला. त्याचवेळी, ‘औरंगजेबाच्या कबरीपुढे नतमस्तक होणाऱ्यांबरोबर उघड किंवा छुपी आघाडी होऊ शकत नाही’, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले.
या राज्यातील बोंबाबोंबीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तातडीची बैठक घेऊन सेनेचे खासदार पक्षातील नेते व कार्यकर्ते यांची मार्गदर्शनपर कार्यशाळा आज दि २० मार्च दुपारी १२.०० वा आयोजित केली. यात जोरदार मार्दर्शन करत जिल्हाप्रमुखांचं शिवसंपर्क अभियान या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी एमआयएमसोबत जाणार नसल्याचं स्पष्ट केलं. शिवसेना ही प्रखर राष्ट्रवादी पक्ष आहे. शिवसेना हिंदुत्ववादी पक्ष आहे आणि विचार आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी जो विचार दिला आहे. तो विचार आपल्याला पुढे घेऊन जायचा आहे.
एम आय एम चा प्रस्ताव म्हणजे भाजपाने सेनेविरोधात कट कारस्थान करण्यासाठी सोडलेलं हे ‘पिल्लू’ असून त्यांचा प्रस्ताव धुडकावून लावलेला असल्याचे स्पष्ट केले. ते पुढे म्हणाले की, आपल्याबाबत संभ्रम निर्माण केला जात आहे. त्याला बळी पडू नका. राज्यातील जनतेत जो संभ्रम निर्माण होत आहे, तो दूर करा, असं उद्धव ठाकरे यांनी खासदार आणि जिल्हा प्रमुखांना सांगितलं.
शिवसंपर्क अभियान
महाराष्ट्रात शिवसेनेच्या संघटनात्मक बांधणीसाठी तसेच राज्यात गेल्या अडीच वर्षात शिवसेनेनं केलेल्या आणि करत असलेल्या विकासात्मक कामांची माहिती सर्वसामान्य जनते पर्यत पोहचवण्यासाठी, शिवसेनेनं “शिव संपर्क अभियान” सुरू केलंय. या अभियानाचा पहिला टप्पा 22 ते 25 मार्च दरम्यान पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यातील एकूण 19 जिल्ह्यात सुरू होणार आहे. या 19 जिल्ह्यात शिवसेनेचे 19 खासदार शिव संपर्क अभियान सुरू करणार आहेत. पहिल्या टप्यातील 19 जिल्ह्यात प्रत्येक जिल्ह्यात शिवसेनेचा एक खासदार आणि त्यांच्या सोबत शिवसेना पदाधिका-याची 12 जणांची टीम कार्यरत असणार आहे. त्यासाठी आपण सर्वांनी जोमाने कामाला लागावे असे मुख्यमंत्री यांनी सांगितले.