माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर शंभर कोटी रुपयांचे कथित वसुली प्रकरणाचा आरोप लावल्यानंतर राज्य सरकारकडून स्थापन करण्यात आलेल्या चांदीवाल आयोगासमोर राज्याचे अल्पसंख्यांक व विकास मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक हे आज चांदीवाल आयोगासमोर हजर होणार आहे. सचिन वाझे यांनी चांदीवाल आयोगाला केलेल्या अर्जावर नवाब मलिक यांना हजर राहण्याचे आदेश आयोगाने दिले असल्याने आज मलिक आयोगासमोर हजर राहणार आहेत.
नवाब मलिक यांनी काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया घरासमोर स्कार्पियो मधील जिलेटिन स्फोटक प्रकरणात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह तसेच निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे हेच मास्टरमाइंड असल्याचे वक्तव्य केले होते. त्या संदर्भात सचिन वाझे यांनी आयोगाला पत्र लिहून म्हटले होते की या प्रकरणात माझे नाव घेतल्याने माझी बदनामी होत आहे. त्यामुळे नवाब मलिक यांनी यासंदर्भात खुलासा करावा की त्यांनी हे वक्तव्य कोणत्या आधारावर आणि पुराव्यावर केले आहे. त्यानंतर आयोगाने नवाब मलिक यांना 14 फेब्रुवारी रोजी नोटीस बजावली होती आणि 17 फेब्रुवारी रोजी आयोगासमोर उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहे.
काय आहे प्रकरण
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर शंभर कोटी रुपयांचे कथित वसुलीचे आरोप केले होते. परमवीर सिंह यांनी आरोपाचे पत्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले होते. यानंतर पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना निलंबित करुन या प्रकरणातील प्रमुख आरोपी म्हणून त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. तसेच देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पालांडे आणि खासगी सहायक कुंदन शिंदे यांनाही या प्रकरणात गेल्या काही महिन्यांपूर्वी अटक करण्यात आली होती. सचिन वाझे सध्या महाराष्ट्र पोलिसांच्या ताब्यात आहे. या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी व्हावी यासाठी राज्य सरकारने चांदीवाल आयोगाचीही स्थापना केली होती. त्यानंतर आयोग या सर्व प्रकरणाचा चौकशी करत आहे.