ठाकरे सरकारमधील आणखी एका मंत्र्याच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या विरोधात तपास करुन गुन्हे दाखल करण्याचे आदेश अकोला जिल्हा न्यायालयाने दिले आहेत. कलम १५६/३ अंतर्गत हे गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे मंत्री बच्चू कडू यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकरांनी बच्चू कडूंविरोधात तक्रार दाखल केली होती. बच्चू कडू यांनी अकोला जिल्ह्यातील तीन रस्त्यांमध्ये १ कोटी ९५ लाखांची आर्थिक अनियमितता केल्याला आरोप वंचित बहुजन आघाडीने केला होता. याच आरोपांप्रकरणी जिल्हा न्यायालयाने हे आदेश दिले आहेत.
वंचित बहुजन आघाडीने या प्रकरणी जानेवारी महिन्यात अकोला पोलिसांकडे तक्रार केली होती. पण पोलिसांनी या प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल केला नव्हता. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीने अकोला जिल्हा न्यायालयात धाव घेतली होती. तसेच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडेही तक्रार केली होती. राज्यपालांनी तक्रार ऐकून योग्य कारवाई करण्याचे आदेश दिले होते. न्यायालयात पुरावे सादर केल्यानंतर आता अकोला जिल्हा न्यायालयाने २४ तासांच्या आत तपास करुन गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला आहे.