कोरोनाचा प्रकोप सुरु झाल्यानंतर राज्यातील मंदिरं बऱ्याच काळापासून बंद आहेत. ही मंदिरं उघडावीत या मागणीसाठी आता मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. राज्यातील मंदिरे उघडण्यासाठी भाजपने सुरू केलेल्या ‘शंखनादा’नंतर घंटानाद आंदोलन सुरू करण्याची घोषणा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. त्याप्रमाणे आता नाशिकमध्ये आज मनसेच्या कार्यकर्त्यांनी काळाराम मंदिरासमोर सरकारच्या नावाने आरती करत अनोखे आंदोलन केले.
मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हे आंदोलन करण्यात आले. यावेळी मनसेने मंदिरे उघडण्याची मागणी करताना राज्य सरकारच्या कारभाराविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान, या आंदोलनावेळी कोरोनाबाबतच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे देखील दिसून आले. त्यानंतर पोलिसांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेत हे आंदोलन बंद पाडले.
दरम्यान, करोना प्रतिबंधाच्या निर्बंधामुळे राज्यातली मंदिरं दीर्घकाळापासून बंद आहेत. ही मंदिरं येत्या आठ दिवसांत उघडावीत, या मागणीसाठी भारतीय जनता पार्टीने आक्रमक भूमिका घेत राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलनं केली होती. राज्यात आंदोलन करणाऱ्या नेत्यांसह कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याने आता मनसेबाबत प्रशासन काय भूमिका घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.