राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांच्या एका वक्तव्याने सध्या चांगलीच खळबळ उडाली आहे. त्यांनी “२०२४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हकालपट्टी होणार” असे मत व्यक्त केले आहे. त्यांनी केलेल्या या वक्तव्यामागे त्यांनी कारणही दिले आहे. पुढचे पंतप्रधान कोण होतील याबद्दलही त्यांनी भाष्य केले आहे.
लालूप्रसाद यादव यांनी एका इंग्रजी वर्तमानपत्राला एक विशेष मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी हे धक्कादायक विधान केले आहे. मोदींची पंतप्रधान पदावरुन हकालपट्टी होईल असे म्हणतानाच त्यांनी त्यामागचे कारणही सांगितले. तसेच “देशातील जनता वाढत्या महागाई आणि बेरोजगारीमुळे कंटाळली आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची २०२४ मध्ये हकालपट्टी होईल” असेही त्यांनी यावेळी म्हटले.
पुढचा पंतप्रधान कोण असेल, असे विचारले असता लालू म्हणाले की, यावर नंतर चर्चा केली जाईल. राहुल गांधी पंतप्रधान होण्याची शक्यता आहे का, असे विचारले असता ते म्हणाले की, एक व्यक्ती काय बोलते किंवा विचार करते याने फरक पडत नाही. लालू म्हणाले की, सर्व समविचारी पक्ष आणि यूपीएच्या सर्व मंत्र्यांनी भेटून चर्चा करावी. राहुल गांधी हे पंतप्रधानपदाचे उमेदवार आहेत का, असे विचारले असता ते म्हणाले की, याचे उत्तर आपण नव्हे तर काँग्रेस पक्ष देईल.
“ते समाजात जातीयवाद पसरवत आहेत. त्यांना (भाजपा) जातीयवादामुळे निवडणुकीत फायदा होत राहील आणि सत्ता मिळत राहील, असे वाटते. जेव्हा मॉस्को (रशिया) येथील भगवान श्रीकृष्णाचे मंदिर तेथील लोकांनी उद्ध्वस्त केले. मी संसदेत बोललो. विश्व हिंदू परिषदेचे लोक तिथे जाऊन का थांबवत नाहीत? ते फक्त त्यांच्याच घरातले सिंह आहेत, गरीब मुस्लिमांना उद्ध्वस्त करण्यात आघाडीवर आहेत,” ते म्हणाले.