काश्मीरमधील लोकांमध्ये परकेपणाची भावना असल्याचेही अब्दुल्ला म्हणाले!
जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. काश्मीरमधून ३७० कलम रद्द करण्याचा मुद्दा असो अथवा खोऱ्यातील दहशतवादाचा मुद्दा ते नेहमीच मोदी सरकारविरोधात आपली नाराजी जाहीर करत असतात. दरम्यान नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी मोदी सरकार देशाला सांप्रदायिक बनवण्याचा प्रयत्न करत असल्याचं म्हटलं आहे.
फारुख अब्दुल्ला यांनी काश्मीरमधील लोकांमध्ये परकेपणाची भावना असल्याचं म्हटलं आहे. आपल्याला सर्वांपासून दूर केलं जात असल्याचं वाटत आहे असं लोकांना वाटत असल्याचं ते म्हणाले. यावेळी त्यांनी काश्मीरमधील स्थिती ज्वालामुखीसारखी असून कधीही स्फोट होऊ शकतो असं म्हटलं.
ज्वालामुखी फुटला तर काय परिणाम होईल असं विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “संपूर्ण देशाला तो सोबत घेऊन जाईल आणि काहीच वाचणार नाही”. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भारतात मुस्लीम होणं कसं वाटतं? यावर त्यांनी टीका करत भयानक असं उत्तर दिलं. ते म्हणाले की “भारत सांप्रदायिक होत चालला आहे का हा प्रश्न आहे. आधी देश धर्मनिरपेक्ष होता. सरकार देशाला सांप्रदायिक बनवत असून लोकांमध्ये फूट पाडत आहे”.
जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्र्यांनी यावेळी विरोधकांमध्ये एकीची कमी आणि तृणमूल व काँग्रेसमध्ये असलेल्या शीतयुद्धावरही भाष्य केलं. ते म्हणाले की, “पश्चिम बंगाल निवडणुकीत भाजपा आव्हान देत असताना काँग्रेस मदत करण्याऐवजी विरोधात उभी राहिली यामुळे ममता बॅनर्जींच्या मनात खदखद असावी असं मला वाटतं”.