कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे. पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी Covaxin या लसीचे दोन डोस घेतले होते. दरम्यान, आता ते अमेरिका दौऱ्यावर गेले आहेत. मोदींना कोवॅक्सिनचा डोस दिल्यानंतरही अमेरिकेत प्रवेशाची परवानगी कशी देण्यात आली यावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी प्रश्न उपस्थित केला आहे. अमेरिकेनं आपल्या लसींच्या यादीत कोवॅक्सिनचा समावेश केलेला नाही. असं अताना पंतप्रधाननरेंद्र मोदी यांना प्रवेश कसा देण्यात आला? असा सवाल दिग्विजय सिंह यांनी केला.
“मला जर योग्यरित्या लक्षात असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी Covaxin लसीचा डोस घेतला होता. याला अमेरिकेनं अद्याप मंजुरी दिलेली नाही. अथवा त्यांनी याशिवाय कोणती दुसरी लस घेतली आहे ज्याला अमेरिकनं प्रशासनानं सूट दिली आहे? देशााला हे जाणून घ्यायचं आहे,” असं दिग्विजय सिंह म्हणाले. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून यावर सवाल केले आहेत.
दिग्विजय सिंह यांच्याशिवाय काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या मार्गारेट अल्वा याचे सुपुत्र निखिल अल्वा यांनीदेखील यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. “आपल्या पंतप्रधानांप्रमाणेच मीदेखील स्वदेशी कोवॅक्सिनचा डोस घेतला आहे. परंतु आता मी इराण, नेपाळ आणि काही अन्य देश सोडून जगाच्या बहुतांश भागात जाऊ शकत नाही. परंतु नरेंद्र मोदी यांना अमेरिकेत जाण्याची संधी मिळाली हे जाणून घेऊन मी हैराण आहे. अमेरिकेनं अद्याप कोवॅक्सिनला मंजुरी दिली नाही. अशात त्यांनी कोणती लस घेतली हा प्रश्न उपस्थित होतो,” असं ते म्हणाले.