नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 9 जून रोजी सकाळी साडेदहा वाजता नवी दिल्लीत प्रगती मैदान येथे ‘जैवतंत्रज्ञान स्टार्टअप प्रदर्शन- 2022’चे उद्घाटन करणार आहेत. उद्घाटनानंतर पंतप्रधान या कार्यक्रमात उपस्थितांना उद्देशून भाषणही करणार आहेत.
जैवतंत्रज्ञान स्टार्टअप प्रदर्शन – 2022 हा दोन दिवसीय कार्यक्रम असून 9 व 10 जून रोजी त्याचे आयोजन करण्यात आले आहे. जैवतंत्रज्ञान विभाग आणि BIRAC म्हणजेच जैवतंत्रज्ञान उद्योग संशोधन सहाय्यक परिषद यांच्यामार्फत हे प्रदर्शन भरवले जाणार आहे. BIRAC च्या स्थापनेला दहा वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त हे प्रदर्शन आयोजित केले जात आहे. ‘जैवतंत्रज्ञान स्टार्टअप नवोन्मेष-: आत्मनिर्भर भारताच्या दिशेने वाटचाल’ अशी या प्रदर्शनाची मध्यवर्ती संकल्पना आहे.
उद्योजक, गुंतवणूकदार, उद्योगजगतातील धुरीण, वैज्ञानिक, संशोधक, जैविक क्षेत्रातील उद्योगांचे जनक, कारखानदार, नियामक, सरकारी अधिकारी आदी घटकांना परस्परांशी जोडण्यासाठी हा मंच उपयुक्त ठरणार आहे. या प्रदर्शनात सुमारे 300 स्टॉल्स असतील. आरोग्यसेवा, जिनॉमिक्स, जैव-औषधशास्त्र, कृषी, औद्योगिक जैवतंत्रज्ञान, कचऱ्यापासून मौल्यवान वस्तूंची निर्मिती, स्वच्छ ऊर्जा अशा विविध क्षेत्रांमध्ये जैवतंत्रज्ञानाचे उपयोजन कसे होऊ शकते, ते या स्टॉल्समधून प्रदर्शित केले जाणार आहे.