मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी सध्या ऑक्सिजन बेडवर असणाऱ्या रुग्णांमध्ये 90 टक्क्यांहून अधिक रुग्णांचे लसीकरण झाले नसल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे लसीकरण न झालेल्यांना तिसऱ्या लाटेचा अधिक धोका जाणवण्याची शक्यता आहे. राज्यासह देशभरात सध्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकट घोंघावत आहे. अशातच राज्यातील बाधितांची वाढती आकडेवारी चिंताजनक बाब आहे.
लसीकरण हा कोरोनापासून संरक्षणासाठी उपाय आहे. पण काही नागरिक अद्यापही लसीकरणाकडे पाठ फिरवत असल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त यांनी या पार्श्वभूमीवर महत्त्वाची माहिती आणि इशारा दिला आहे. चहल यांनी म्हटले आहे की, सध्या ऑक्सिजनवर असणाऱ्या कोरोनाबाधितांपैकी 90 टक्के नागरिकांचे लसीकरण झालेले नसल्यामुळे ज्या नागरिकांचे लसीकरण झालेले नाही. त्यांना प्रादुर्भावाची भीती जास्त आहे. कोरोना लसीकरणाच्या साहाय्याने आपण तिसरी लाट थोपवू शकतो. ज्या नागरिकांचे लसीकरण झालेले नसेल त्यांनी लसीकरण करा, असे आवाहनही आयुक्तांनी केले आहे.
लॉकडाऊन व्हावा की नाही हे नागरिकांनी ठरवावे. कारण जर त्यांनी नियमांचे पालन केले नाही, तर कोरोनाबाधितांची संख्या वाढून निर्बंध आणखी कडक करावे लागतील, असे वक्तव्य मुंबई महापालिका आयुक्त डॉ. इक्बालसिंह चहल यांनी केले. लॉकडाऊनबाबत दोन महत्त्वाचे निकष, आहेत. हॉस्पिटलमध्ये किती बेड भरले आणि किती शिल्लक आहेत. दुसरा म्हणजे ऑक्सिजनचा वापर. कारण जर ऑक्सिजनचा वापर वाढला, हॉस्पिटलमध्ये लोक मोठ्या प्रमाणात दाखल झाले, तर लॉकडाऊनबाबता निर्णय होऊ शकतो, असेही चहल म्हणाले. कोरोनाच्या आकड्यांवर लॉकडाऊन होऊ शकत नाही, तर हॉस्पिटलच्या वापरावर निर्णय होणार असल्याचेही ते म्हणाले. ओमिक्रॉनला हलक्यात घेऊ नका, तो एक व्हायरस असल्याचेही चहल यावेळी म्हणाले.