नागपूर: नागपुरातील दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदार संघातील जयप्रकाशनगर जवळील प्रस्तवित ३०.३९ हेक्टर क्षेत्रातील लंडन स्ट्रीटचे फक्त नाव बदलून ऑरेंज सिटी स्ट्रीट ठेवण्यात आले आहे. याठिकाणी उभारण्यात येणाऱ्या शॉपिंग कॉम्पलेक्स, मॉलचे बांधकाम आठव्या मजल्यापर्यंत झालेले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे ड्रीम प्रोजेक्ट “ऑरेंज सिटी स्ट्रीट ” प्रकल्पावर साडेचार हजार कोटींहून अधिक खर्च होणार आहे.
सोमलवाडा, खामला, भामटी, टाकळी, जयताळा परिसर प्रस्तावित ऑरेंज सिटी स्ट्रीटमध्ये निवासी, व्यावसायिक संकुलासह, आयटी पार्क, ग्रीन झोन, भाजीपाला मार्केट, मेडिकल झोन इत्यादींचा समावेश आहे. वर्धा रोड ते सोमलवाडा, खामला, भामटी, परसोडी, टाकणी, जयताळा टी पॉईंटपर्यंत ५.५० किमी मध्ये १०७५९८४.४० चौ. मीटर क्षेत्रात बांधकाम प्रस्तावित आहे. प्रकल्प मोठा असल्याने २१ भागात विभाजित केला आहे. यात ६० निवासी व १३ व्यावसायिक इमारतींचा समावेश आहे. हाफिज काँट्रॅकटर प्रकल्पाचे सल्लागार आहेत. स्थायी समितीचे माजी अध्यक्ष संदीप जोशी यांच्या कार्यकाळात लंडन स्ट्रीटला ऑरेंज सिटी स्ट्रीट असे नाव देण्यात आले.