बारामतीसह पुणे जिल्ह्यातून जाणारी मुंबई-हैद्राबाद ही बुलेट ट्रेन ६५० किमीचे अंतर अवघ्या तीन तासांत कापणार आहे. शुक्रवारी (दि. २२) बारामतीत नॅशनल हायस्पीड रेल्वे काॅर्पोरेशनकडून या प्रकल्पाच्या प्रारुप आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले. त्यात प्रकल्पाविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. यावेळी जनसुनावणीही पार पडली.
बारामतीचे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांच्यासह नॅशनल हायस्पीड रेल्वे काॅर्पोरेशन लि.चे अनिल शर्मा, सत्यव्रत पांडे, शाम चौगुले यांनी प्रारुप आराखडा सादर करण्यात आला. डाॅ. अपर्णा कांबळे व प्राजक्ता कुलकर्णी यांनी या मार्गाविषयी सविस्तर माहिती दिली. देशात सध्या प्रस्तावित तीन मार्गांवर या विभागाकडून काम सुरु आहे. त्यात मुंबई-अहमदाबाद मार्गाचे काम सुरु झाले आहे. मुंबई-हैद्राबाद व मुंबई-नागपूर या मार्गावरही काम सुरु केले जाणार आहे.
मुंबई-हैद्राबाद हा मार्ग राज्यातील ठाणे, रायगड, पुणे व सोलापूर या चार जिल्ह्यांतून जाणार आहे. ग्रीन कॅरिडाॅर (बागायती क्षेत्र) मधून हा मार्ग जात आहे. पूल व बोगद्यातून ही बुलेट ट्रेन जाईल. रस्त्यावरून ती धावणार नाही. जिल्ह्यात लोणवळ्याला ८४.५५ किमी अंतरावर पहिला, पुण्यात १४६ किमी अंतरावर दुसरा तर बारामतीत २१९ किमी अंतरावर तिसरा थांबा असेल. जिल्ह्यात २०४ किमी लांबीचे अंतर ही ट्रेन धावेल. बारामतीत गाडीखेल (कटफळ) जवळ तिचे स्टेशन असेल.