कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे मार्च महिन्यापासून राज्यात पुन्हा निर्बंध कडक केल्यानंतर मुंबई लोकलसेवा सर्वसामान्यांसाठी बंद करण्यात आली होती. आता जनजीवन पूर्वपदावर येत असून कोरोना स्थिती देखील आटोक्यात येत आहे. त्यामुळे लोकल प्रवासाची मुभा सर्वसामान्यांना सरसकट मिळावी अशी मागणी मागील अनेक दिवसांपासून जोर धरू लागली आहे.
दरम्यान याच पार्श्वभूमीवर आज केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले कि, ‘कोरोना आटोक्यात आल्याने जर आम्हाला राज्य सरकारने म्हणजेच मुख्यमंत्र्यांनी सर्वसामान्यांना रेल्वे सुरू करण्यासाठी पत्र पाठवले तर आम्ही परवानगी देऊ त्यावर आमची काहीही हरकत नसेल. मुंबई लोकल ट्रेन सुरु करण्यासाठी केंद्र सरकारची कोणतीही अडचण नाही, आम्ही 15 ऑगस्टपासून तशीही परवानगी दिली आहे. आता जरी परवानगी मागितली तरी आमची कोणतीही अडचण नाही, आम्ही परवानगी देऊ, असे स्पष्ट मत याबाबत बोलताना दानवे यांनी व्यक्त केले आहे.
दरम्यान गेल्या आठवड्यात गणेशोत्सवादरम्यान, ज्यांनी 2 डोस घेतले होते त्यांच्या नोंदणीची संख्या अचानक वाढली आहे. पश्चिम रेल्वेवर, जिथे दररोज 4 ते 5 हजार नोंदणीकृत लोक मासिक हंगामाची तिकिटे घेत असत, गेल्या आठवड्यात हा आकडा 10 हजारांवर पोहोचला होता. मध्य रेल्वेवरही अशीच परिस्थिती दिसून आली. त्यामुळे आता चिंता व्यक्त केली जात आहे.