उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया टॉवरजवळ कारमध्ये ठेवण्यात आलेली स्फोटकं आणि याच कारचा मालक मनसुख हिरन याची ठाण्यात झालेली हत्या या प्रकरणात अटकेत असलेला आणि मुंबई पोलीस दलातून बडतर्फ करण्यात आलेल्या सचिन वाझे याला हृदयविकारावरील उपचारांबाबत कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. न्यायालयानेसचिन वाझे याला हृदयाच्या आजाराशी संबंधी खासगी रुग्णालयात उपचार घेण्याची परवानगी दिली.
खासगी रुग्णालयात करण्यात येणाऱ्या उपचाराचा खर्च वाझे व त्याच्या कुटुंबिय करेल, असे विशेष एनआयए न्यायालयाने स्पष्ट केले. वाझे सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. खासगी रुग्णालयात उपचार घेण्याची परवानगी मिळावी यासाठी वाझे याने त्यांच्या वकिलामार्फत विशेष न्यायालयात अर्ज केला आहे. आपल्या तीन धमन्यांमध्ये ९० टक्क्यांहून अधिक ब्लॉकेज आहेत. डॉक्टरांनी तत्काळ शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला आहे.
सचिन वाझेने कोर्टाला सांगितलं की आपला फादर स्टॅन स्वामी यांच्याप्रमाणे जेल कोठडीतच मृत्यू होऊ नये अशी आपली इच्छा आहे. त्यामुळे आपल्याला तातडीनं योग्य वैद्यकीय उपचारांची गरज असल्याचं त्यानं कोर्टाला सांगितलं. वाझेच्या वकिलांनी याआधी न्यायालयाला सांगितले होते की, मागील १४ दिवसांपासून त्याला जेजे हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले जात आहे. तिथे त्याला ओपन हार्ट सर्जरी करण्याचा सल्ला मिळाला आहे. याबद्दलची परवानगी मागताना वाझे याने न्यायालयामध्ये ‘माझा स्टॅन स्वामी होऊ देऊ नका, मला लवकरात लवकर खाजगी रुग्णालयात उपचार घेण्याची परवानगी द्या,अशी विनंती केली.दरम्यान, शहरी नक्षलवाद प्रकरणातील 84 वर्षीय आरोपी फादर स्टॅन स्वामी यांचा काही महिन्यांपूर्वी उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.