नागपूर मनपा निवडणुकीच्या तोंडावर गटबाजीमुळे काँग्रेस भाजप पक्ष हैराण
नागपूर :- आगामी मनपा निवडणुकीच्या तोंडावर भाजप (BJP) आणि कॉंग्रेस (Congress) या दोन्ही पक्षात गटबाजीला उधान आले आहे. गटबाजीमुळे दोन्ही पक्ष हैराण झाले असून नागपुरात गल्लोगल्लीत वरून कीर्तन अन् आतून तमाशा सुरु असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. जनसंघापासून शिस्तबद्ध म्हणून ओळख असलेल्या संस्कारित भाजपची वाटचालही संघभूमीत काँग्रेसच्याच पावलावर पाऊल टाकणारी आहे. काँग्रेससाठी गटबाजी नवीन नाही, ते त्या पक्षाच्या जिवंतपणाचे लक्षण मानले जाते. त्यामुळे, नागपूर मनपा निवडणुकीसाठी मंगळवारी आरक्षण जाहीर झाल्यानतर दोन्ही पक्षात निवडणूक मोर्चेबांधणीला जोर चढला आहे.
नागपुरात शहरअध्यक्ष विकास ठाकरे, पालकमंत्री नितीन राऊत व जिल्ह्याचे नेते व मंत्री सुनील केदार यांच्यात बेबनाव आहे. तर, नितीन राऊत पालकमंत्री असूनही नागपुरात त्यांचा कॉंग्रेस पक्षासाठी काहीही फायदा नाही. तसेच, दुसऱ्या राज्यातून राज्यसभेवर मुकुल वासनिक यांना पाठवण्याचा पक्षश्रेष्ठींचा निर्णय देखील नागपुरातील अनेक निष्ठावंतांवर अन्याय करणारा ठरला असल्याची कुजबुज कॉंग्रेसच्या गोटात आहे. पक्षबांधणी किवा पक्षवाढीसाठी कोणतीही भूमिका पार न पाडणाऱ्या निष्क्रिय मुकुल वासनिक यांना खासदार केल्याने नागपुरात पक्षाला काय फायदा होणार? त्यांचे लाड का पुरवले जातात? अशा तिखट शब्दांत प्रतिक्रिया पक्षपातळीवर नागपुरात उमटू लागल्या आहेत. काँग्रेसमध्ये गटबाजीशिवाय दुसरे काहीच होत नाही, त्यामुळे इतर नेते नाराज आहेत.
नागपूर महापालिकेची निवडणूक भाजपसाठी महत्त्वाची असल्याने ती जिंकण्यासाठी पक्ष सर्वशक्तीपणाला लावणार हे निश्चित आहे. मात्र, शहरात भाजपला नागपूर पदवीधर निवडणुकीपासून गटबाजीने पोखरले आहे. पदवीधर मतदारसंघातील पराभवामुळे तत्कालीन महापौर संदीप जोशी यांनी राजीनामा दिला होता. जोशी यांच्या पराभावासाठी गटबाजीच कारणीभूत असल्याचे भाजप जाणकारांचे मत आहे. संघटनात्मक पातळीवर एकमेकांना विश्वासात न घेतल्यामुळे शहरातील आमदार आणि पक्षाचे पदाधिकारी यांच्यातील दरी वाढत चालली आहे. शहरात भाजपचे चार आमदार आहेत. माजी आमदार सुधाकर कोहळे यांची मागच्या विधानसभा निवडणुकीत कापलेली उमेदवारी हा गटबाजीचाच एक भाग होता. या साऱ्या गटबाजीचा हिशोब नागपूर महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने चुकता होणार असल्याचे बोलले जात आहे.
नागपूरच्या राजकारणात महाविकास आघाडी सरकार मधील घटक पक्ष शिवसेना व राष्ट्रवादी अदखलपात्र ठरणारे पक्ष ठरावे, इतकी त्यांची अवस्था दयनीय आहे. राज्याचा मुख्यमंत्री शिवसेनेचा पक्षप्रमुख असतानाही जिल्ह्यात शिवसेनेत उत्साह नाही. कोणी तरी येतो आणि एका रात्रीतून कार्यकारिणी बदलतो, याचा कार्यकर्त्यांवर वाईट परिणाम झाला आहे. तर, राष्ट्रवादी पक्षाला स्थानिक पातळीवर नेतृत्वच नाही. मागच्या दाराने संसदेत नेहमी खासदार होऊन प्रवेश करणारे विदर्भाचे प्रफुल्ल पटेल यांनी नागपुरात राष्ट्रवादी वाढूच नये असा संकल्प केला आहे काय असा संभ्रम नागपुरातील राष्ट्रवादीच्या कार्येकार्त्यांमध्ये आहे. ‘नेते जास्त अन कार्येकर्ते कमी’ अशी अवस्था राष्ट्रवादी पक्षाची आहे. मुंबई-दिल्लीहून येणाऱ्या नेत्यांच्या मागे धावणारा पक्ष अशी राष्ट्रवादीची नागपुरात ओळख आहे.