अभिनेते संजय दत्त यांच्या हस्ते आज होणार उद्घाटन
नागपूर शहरातील प्रसिद्ध असलेला खासदार सांस्कृतिक महोत्सव -2021 चा शानदार उद्घाटन सोहळा शुक्रवार, 17 डिसेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या पटांगणात होणार आहे. हा मध्य भारतातील सर्वात मोठा सांस्कृतिक उत्सव मानला जात आहे. बॉलीवुडचे प्रसिद्ध अभिनेते संजय दत्त यांच्या हस्ते खासदार महोत्सवाचे उद्घाटन होणाराय. कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व आयोजन समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह खासदार, आमदार व इतर अनेक मान्यवर उपस्थित राहतील.
चक दे इंडिया थीमवर लाईव्ह इन कॉन्सर्ट
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून 2017 साली खासदार सांस्कृतिक महोत्सवाला प्रारंभ झाला होता. भारतीय कला व संस्कृतीचा प्रचार-प्रसार व्हावा, विदर्भातील प्रतिभावंतांना मोठा मंच मिळावा, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या कलाकारांची कला नागपूरकरांना अनुभवता यावी, या हा त्यामागील उद्देश होता. कोविड महामारीमुळे दोन वर्षांच्या खंडानंतर परत एकदा खासदार महोत्सवाचं भव्य आयोजन करण्यात आलंय. यंदा देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत आहे. त्याच संकल्पनेवर महोत्सवाची आखणी करण्यात आलेली आहे. मान्यवरांच्या उपस्थितीत खासदार सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन झाल्यानंतर लगेच चक दे इंडिया या थीमवर फिल्मफेअर अवॉर्ड विजेते पार्श्वगायक सुखविंदर सिंह यांची लाईव्ह इन कॉन्सर्ट होणार आहे. सुखविंदर सिंह खासदार सांस्कृतिक महोत्सवात देशभक्तीपर गीतांच्या माध्यमातून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव धुमधडाक्यात साजरा करणार आहेत.