नागपूर : सत्ता लालसेपोटी कोण कोणत्या स्तारावर पोहचेल हे सध्याच्या घडीला सांगता येणे अशक्य असून याचे मूळ कारण आहे; चार पायाची खूर्ची. या खूर्चीपायी राज्याच्या उपराजधानीत दोन राजकारण्यांचा वाद शिगेला पोहचल्याने राजकीय वर्तुळात तर्क वितर्कांना उधाण आले आहे. नागपुरातल्या दोन्ही आमदारांमधील खुर्च्यांचा हा वाद एवढ्या शिगेला पोहोचला आहे की आता मनपास एकाच दिवसात खुर्च्यांवर लिहिलेले एका नेत्याचे नाव पुसून पुन्हा दुसऱ्या नेत्याचे नाव लिहिण्याची वेळ आली आहे.
राज्याच्या राजकारणात दोन नेत्यांमध्ये खुर्चीसाठीचा संघर्ष फार जुनाच आहे. मात्र, नागपुरात दोन नेत्यांमध्ये खुर्चीचा एक वेगळाच वाद रंगला आहे. म्हणजे जुन्या बाटलीत नवीन ‘रंगीत पाणी’. या वादामध्ये दोन्ही आमदारांचे राजकीय डावपेच नाही, तर महापालिकेतील भ्रष्ट कारभार कारणीभूत असल्याचे समोर आले आहे. भाजप आमदार कृष्णा खोपडे आणि काँग्रेस आमदार अभिजित वंजारी यांच्यात हा वाद रंगला असून, ‘एक फूल दो माली’ अशी गत या दोन्ही आमदारांची झाली आहे.
नेमके प्रकरण काय आहे?
उत्तर नागपूरच्या अगदी पूर्व टोकावर असलेल्या शांतीनगर, प्रेमनगर आणि इतर अनेक वस्त्यांमधील बेंचेसवर काल, परवापर्यंत आमदार कृष्णा खोपडे यांचे नाव लिहिले होते. कारण हे बेंचेस खोपडे यांच्या विकास निधीतून देण्यात आले होते. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून महापालिकेच्या स्थानिक अधिकाऱ्यांच्या निर्देशांनुसार त्या बेंचेसवरील कृष्णा खोपडे यांचे नाव मिटवून त्यावर आमदार अभिजित वंजारी यांच्या नावाने ते बेंचेस दिसू लागले आहे; म्हणजेच खोपडे यांच्या नावास तिलांजली देण्याचा प्रकार घडला आहे.
नागपुरातील कृष्णा पराते या पेंटरने दिलेल्या माहितीनुसार, “त्यांना महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी शांतीनगर आणि प्रेमनगर भागातील जुन्या बेंचेसवर स्थानिक आमदार कृष्णा खोपडे यांचे नाव पुसून 2022 च्या योजनेप्रमाणे विधान परिषदेचे आमदार अभिजित वंजारी यांचे नाव लिहिण्यास सांगितले होते. त्यानुसार कालपासून त्यांनी कृष्णा खोपडे यांचे नाव पुसून त्यावर अभिजित वंजारी यांचे नाव लिहिण्याचा श्रीगणेशा केला.
जुन्या बेंचेसवर नवे रंग लावून तेच जुने बेंच 2022 – 23 या वर्षाच्या नव्या योजनेत दाखवून दुसऱ्या आमदारांच्या नावावर नागरिकांच्या माथी मारण्याचा हा प्रकार म्हणजे भ्रष्टाचार असल्याचे काही दक्ष नागरिकांच्या लक्षात आले. त्यानंतर नागरिकांनी ही माहिती आमदार कृष्णा खोपडे यांच्यासह महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिली.
पहिले नाव पुसून दुसरे नाव टाकण्याचा हा प्रकार भ्रष्टाचाराचा असून आमदार अभिजित वंजारी यांच्या विकास निधीतून खर्च दाखवून त्यासाठी जुनेच बेंच वापरून बोगस बिले काढण्याचे काही भ्रष्ट अधिकाऱ्यांचे प्रयत्न असल्याचा आरोप कृष्णा खोपडे यांनी केला आहे. याबरोबरच महापालिकेने दोषी अधिकाऱ्यांना त्वरित निलंबित करावे अशी मागणी देखील खोपडे यांनी केली आहे.
पुन्हा कृष्णा खोपडे यांचे नाव
मनपातून बोगस बिले काढण्याचा प्रकार उघड झाल्यानंतर महापालिकेच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी एकाच रात्रीत आपला निर्णय बदलला आहे. ज्या बेंचेसवर आमदार कृष्णा खोपडे यांचे नाव पुसून आमदार अभिजित वंजारी यांचे नाव लिहिण्यात आले होते त्या बेंचेसवर आज सकाळपासून पुन्हा वंजारी यांचे नाव पुसून कृष्णा खोपडे यांचे नाव लिहिण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे हे जुनेच बेंच वापरून आमदारांच्या विकास निधीतून खर्च दाखवून बोगस बिले काढण्याचा प्रकार आहे का? असा संशय निर्माण झाला आहे.
या प्रकरणी एका वृत्त वाहिनीने आमदार अभिजित वंजारी यांच्याशी संपर्क साधला असता, “आपल्या विकास निधीतून नागरिकांना नवे बेंचेस महापालिकेने दिले पाहिजेत अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे महापालिकेतील काही भ्रष्ट अधिकारी फक्त नागरिकांनाच फसवत नाहीत, तर ते आमदारांना देखील फसवत असल्याचे समोर आले आहे.