प्रकाश आंबेडकर यांचा दावा
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना १०० कोटी वसुली प्रकरणात फसवल्याचं दिसत आहे. माझी त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना विनंती आहे की, त्यांनी कुणाला तरी वाचवण्यासाठी स्वत:चा बळी देऊ नये. त्यांनी गोळा केलेले पैसे कुणाला नेऊन दिले हे त्यांनी सांगावं. त्यांनी कायद्याला सहकार्य केले तर ते माफीचे साक्षीदार होऊ शकतात, असा खळबळजनक दावा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर
यांनी केला.
उच्च न्यायालयाने अनिल देशमुखांना 12 नोव्हेंबरपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. त्यांच्या १०० कोटी वसुली प्रकरणावरुन प्रकाश आंबेडकरांनी हा दावा केला आहे. नागपूर येथील रविभवनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ”या प्रकरणात दाखवलं एक जातय आणि करतयं दूसरचं, असा प्रकार सुरु आहे. आता हा प्रकार थांबवला पाहिजे, असं मला वाटतय, अन्यथा राज्यपालांनी यात लक्ष घालून योग्य तो निर्णय घ्यावा,” अशी मागणी आम्ही करणार आहोत, अशी भूमिकाही प्रकाश आंबेडकरांनी घेतली आहे.
”अनिल देशमुख या प्रकरणात फसले गेले आहेत, कलेक्शन झाले असल्याची माहिती विभागाकडून मिळते. पण चौकशी यंत्रणेला देशमुखांकडे पैसे मिळालेले नाही, मग हे पैसे कोणाकडे गेले, वसुलीतून जे पैसे जमा झाले, ते कोणाकडे गेले, याचा खुलासा अनिल देशमुखांनी करायला हवा. त्यांनी कायद्याला सहकार्य केल्यास, ते माफीचा साक्षीदार होऊ शकतात आणि त्यांची सुटका होऊ शकते. १०० कोटी वसुली प्रकरणात मोहरे समोर येत आहेत; पण मुख्य वजीर आणि राजा समोर येत नाही. पोलीस यंत्रणाही त्यांना समोर आणत नाही. त्यामुळे राज्यपालांनी यात लक्ष घालणे गरजेचे आहे,” असे प्रकाश आंबेडकरांनी म्हटले आहे.