नागपूर: नागपूर शहर आणि जिल्ह्यातील जेष्ठ नागरिक तसेच दिव्यांगांना केंद्र शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी ‘राष्ट्रीय वायोश्री योजना २०२१’ सुरु करण्यात येत आहे, अशी माहिती पत्रपरिषद केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.
सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाच्या अंतर्गत या योजनात दारिद्ररेषेखालील (BPL & LPL) तसेच आर्थिकदृष्ट्या कमकुवत दिव्यांग आणि वयाची ६० वर्ष पूर्ण केलेल्या जेष्ठ नागरिकांना सहायक उपकरणाचे वितरण करण्यासाठी पात्र लाभार्थींची नोंदणी करण्यात येणार आहे.
यात जेष्ठांची नोंदणी, लाभार्थी पात्रतेची यादी तयार करण्यात येईल तसेच तपासणी करण्यात येईल. तसेच तासपासणी करून व्हीलचेअर, तीनचाकी, ब्रेल स्टेल, कॅलिपर्स वॊकिंग स्टिकस, क्रचेस, चष्मे अशा ५० प्रकारच्या उपकरणांचा निशुल्क लाभ पात्र जेष्ठांना देण्यात येणार आहे.
आपल्या लोकसंख्येतील अंदाजे १० टक्के लोक हे जेष्ठ नागरिक असतात. नागपूर शहर व जिल्ह्यातील १४ तालुके मिळून हि संख्या ८ ते १० लाख असावी, असा अंदाज आहे. यातील काही नागरिक दिव्यांग असतात, काहींना वयोमानानुसार कुठल्यातरी प्रकाराची निर्बलता किंवा अपंगत्व येते. त्यांना अशा उपकरणांची गरज असते.
या योजनेत ज्या दिव्यांगांना ४० टक्के किंवा त्याहून अधिक अपंगत्व आहे त्यांना देखील उपकरणांची मदत करण्यात येणार आहे. वायोश्री योजना आणि दिव्यांग सहायता योजनेच्या भावी लाभार्थींसाठी नोंदणी आणि मूल्यांकन शिबिरे तसेच उपकरण वितरण शिबिरे नागपूर शहर आणि नागपूर जिल्ह्यातील सर्व तालुका स्तरावर आयोजित केली जाणार आहे. नागपूर शहरातील महानगरपालिका झोन कार्यालयांमध्ये २८ फेब्रुवारी ते २० मार्चपर्यंत या योजनेसाठी नोंदणी प्रक्रिया सुरु होणार असल्याची माहिती नितीन गडकरी यांनी दिली.
शहरात दिवायंग पार्क उघडणार असल्याचेही गडकरी यांनी सांगितले. त्याकरिता मनपाकडे तीन एकर जागा मागण्यात येईल असेही गडकरी यावेळी म्हणाले.