आज पाचशे आणि हजारच्या नोटा बंद करण्याच्या ऐतिहासिक निर्णयाला पाच वर्षे पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने विरोधकांनी मोदी सरकारवर टीका करण्याची संधी साधली आहे. याविषयी जनतेतही चर्चा सुरू असून नोटबंदीच्या निर्णयावरुन राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनीही आज सकाळी माध्यमांशी संवाद साधताना टीका केली आहे.
मलिक नोटबंदीच्या निर्णयावर टीका करत असताना म्हणाले, संपूर्ण देशात नोटबंदीमुळे हाहाकार माजला होता. नोटा बदलण्यासाठी लोकांना रांगेत उभे राहावे लागले होते, या दरम्यान अनेकांचा त्यात मृत्यू झाला आणि त्यानंतर मोदीजी म्हणाले होते की, तीन महिन्यांचा मला वेळ द्या. पण पाच वर्षे झाली ना काळा पैसा नष्ट झाला ना भ्रष्टाचार, ना दहशतवाद संपला. पण नोटबंदीमुळे बेरोजगारी वाढली. नोटबंदीच्या निर्णयामुळे देशाची अर्थव्यवस्था हादरली. या निर्णयाला आज पाच वर्षे झाली. मोदीजी, तुम्ही त्यावेळी म्हणाला होता मला भर चौकात शिक्षा द्या. मोदीजी, आम्ही विचारत आहोत की तो कोणता चौक आहे आणि देशाच्या जनतेने तुम्हाला कोणती शिक्षा द्यावी?