राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी काही कमी होताना दिसत नाहीयेत. काल आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी अनिल देशमुखांच्या घरासह इतर मालमत्तांवर धाड टाकली. त्यानंतर आज पुन्हा दुसऱ्या दिवशी आयकर विभागाने अनिल देशमुख यांच्याशी संबंधित ठिकाणांवर धाड टाकली आहे.
सध्या देशमुख हे गायब आहेत. ईडी त्यांचा शोध घेत असून दिवसेंदिवस त्यांच्या अडचणी देखील वाढत आहेत. अशातच, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी देशमुख यांच्या अटकेबाबत महत्वाचा दावा केला असून त्यांनी परिवहन मंत्री अनिल परब आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याबाबत देखील धक्कादायक दावा केला आहे.
‘दिवाळीपर्यंत जनतेला वाट पाहावी लागणार नाही. दिवाळीपूर्वीच राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांना तुरुंगात जावं लागेल. त्यानंतर अनिल परब यांचा नंबर लागेल. नंतर हसन मुश्रीफ यांच्यावरही कारवाई होणार आहे,’ अशी भविष्यवाणी सोमय्या यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना केली. यासोबतच, अनिल परब यांची माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही. उलट परब यांनीच राज्यातील साडेबारा कोटी जनतेची माफी मागितली पाहिजे. लॉकडाऊन असताना परब बेकायदेशीरपणे रिसॉर्ट बांधत होते. याची त्यांना लाज वाटली पाहिजे, असं देखील सोमय्या यांनी म्हटलं आहे.