राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एका मुलाखतीमध्ये काँग्रेसची स्थितीबद्दल भाष्य केलं होतं. काँग्रेसची अवस्था गतवैभव गमावलेल्या जमीनदारासारखी झाली आहे, असं भाष्य पवारांनी केलं होतं. हे विधान काँग्रेसला चांगलंच झोंबल्याचं दिसून येत आहे. काँग्रेस नेते आणि राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी पवारांनी काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र यावं अशी ऑफर देत टोला लगावला होता.
आता राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी देखील बाळासाहेब थोरात यांचं समर्थन केलं आहे. ‘खरंतर सर्व विरोधी पक्षाने एकत्र येण्याची गरज आहे. राष्ट्रवादी तर मूळ काँग्रेसच्या विचारधारेतूनच निर्माण झालेला पक्ष आहे. त्यामुळे आपण आपसात मतभेद ठेवण्यापेक्षा, टोकाची भूमिका घेण्यापेक्षा आणि एकमेकांना दुखावण्यापेक्षा एकमेकांच्या विरोधात बोलण्यापेक्षा एकत्रं आलं पाहिजे,’ असं मत वडेट्टीवार यांनी माध्यमांशी बोलताना मांडलं.
यासोबतच, ‘आपण एकाच विचारधारेचे आहोत. अशावेळी राष्ट्रवादीने काँग्रेसमध्ये विलीन होण्याची बाळासाहेबांनी जी भूमिका मांडली ती योग्य आहे. पवारांनी काँग्रेसमध्ये येऊन शक्ती वाढवावी ही भूमिका योग्यच आहे,’ असं देखील वडेट्टीवार म्हणाले.
बाळासाहेब थोरात काय म्हणाले होते ?
पवार यांच्या विधानाचा काहीच परिणाम होणार नाही. विरोधकांनी या विधानाचा कितीही राजकीय लाभ उठवण्याचा प्रयत्न केला तरी काँग्रेसचे नुकसान होणार नाही. राज्यघटनेच्या मूलभूत तत्त्वाशी बांधिल असलेल्यांनी टीका करण्यापेक्षा काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र यावे आणि लोकशाही तसेच राज्यघटना टिकवण्यासाठी एकत्र लढा द्यावा, असं आवाहन बाळासाहेब थोरात यांनी शरद पवार यांना केलं.