देशाच्या सर्व माजी पंतप्रधानांच्या योगदानाचा सन्मान करणारा भाजप हा एकमेव पक्ष आहे. आत्तापर्यंत भाजपचा फक्त एकच पंतप्रधान (अटलबिहारी वाजपेयी) झाला, बाकी तर त्यांचेच (काँग्रेससह विरोधक) होते. माजी पंतप्रधान कोणत्याही पक्षाचे असोत, पक्षीय राजकारणापलीकडे जाऊन त्यांचा आदर केला पाहिजे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पक्षाच्या खासदारांना सांगितले. डॉ. आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रात मंगळवारी झालेल्या भाजपच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत मोदींनी पक्षाच्या खासदारांना ‘पंतप्रधान संग्रहालया’ला आवर्जून भेट देण्याची सूचना केली.
देशाचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांचे तत्कालीन निवासस्थान व आत्ता ‘नेहरू संग्रहालया’मुळे प्रसिद्ध असलेल्या तीन मूर्ती भवन परिसरात नवे ‘पंतप्रधान संग्रहालय’ उभारण्यात आले आहे. घटनाकार-भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतदिनी, १४ एप्रिल रोजी या संग्रहालयाचे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. त्याच दिवशी डॉ. आंबेडकर संग्रहालयाचेही उद्घाटन केले जाणार आहे. पं. नेहरूंची साहित्यसंपदा नेहरू संग्रहालयामध्ये कायम ठेवली जाणार असून नव्या संग्रहालयात उर्वरित १४ माजी पंतप्रधानांच्या सविस्तर कार्याची माहिती देणारे विविध साहित्य लोकांना पाहता येईल.