आजही अनेक कार्यक्रमांमध्ये ज्येष्ठ व्यक्ती ‘गांधी टोपी’ परिधान करत असल्याचे दिसून येते. स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन यावेळी सुद्धा ही टोपी घातल्याचे पाहायला मिळते. तर, नेते मंडळी सुद्धा काही काळापूर्वी गांधी टोपी घालून मिरवत असायचे. याच गांधी टोपीवरून आता एक वाद सुरु झाला आहे. याला कारण म्हणजे एका भाजप नेत्याने केलेलं विधान!
भाजप नेत्यानं ‘गांधी टोपी पंडित नेहरू परिधान करायचे, महात्मा गांधी नाही’, अशा आशयाचं विधान केल्यानंतर काँग्रेस पक्षानं यावर आक्षेप नोंदवला आहे. त्यामुळे देशात आता गांधी टोपीवरून नवीन वादाला सुरुवात झाली आहे. काँग्रेसने देखील भाजपला चोख प्रत्युत्तर दिलं आहे. ‘स्वातंत्र्य लढ्यात ज्यांनी इंग्रजांची साथ दिली, ते आता स्वातंत्र्य सेनानी आणि भारताच्या पहिल्या पंतप्रधानाला टार्गेट करत आहेत,’ अशी टीका काँग्रेसने भाजपवर केली आहे.
नेमकं प्रकरण काय आहे?
भाजपच्या गुजरात युनिटचे नवनियुक्त सरचिटणीस रत्नाकर यांनी दावा केला की, महात्मा गांधींनी कधीही गांधी टोपी घातली नव्हती. पंडित जवाहरलाल नेहरू मात्र ही टोपी परिधान करायचे. रत्नाकर यांच्या विधानानंतर त्यांच्यावर अनेकांनी टीका केली आहे. पण गुजरातचे उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी रत्नाकर यांची बाजू घेतली आहे. ते सोमवारी म्हटले की संबंधित टोपी ‘गांधी टोपी’ म्हणून ओळखली जात असली तरी राष्ट्रपितांनी ती टोपी कधीही घातली नाही. ही टोपी घातलेली त्यांना कोणीही पाहिलं नाही. यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत काँग्रेसच्या गुजरात युनिटनं म्हटले की, ज्यांनी कधीही स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला नाही. स्वातंत्र्य लढ्यात ब्रिटिशांची बाजू घेतली ते लोकं आता स्वातंत्र्य सैनिक आणि भारताचे पहिले पंतप्रधान यांच्याकडे बोट दाखवत आहेत.