नागपूर: काल दि २० जून रोजी विधान परिषद निवडणुकीचे निकाल लागले. भाजपने राज्यसभा निवडणुकीच्या निकालाची पुनरावृत्ती करत महाविकास आघाडीला पुन्हा जोरदार धक्का दिला. भाजपने लागोपाठ दोन निवडणुकीत आघाडीला रणनीतीने लोळवल्यानंतर आता पुढे काय होणार याकडे लक्ष लागलेलं असतानाच राज्यात नवा ‘हाय व्होल्टेज ड्रामा’ सुरू झाला.
विधान परिषद निवडणुकीच्या निकालाने राज्यात राजकीय अस्थिरतेच्या चर्चांना उधाण आलंय. राज्यसभेप्रमाणेच विधान परिषद निवडणुकीचा निकाल रात्रीपर्यंत रंगला. एकीकडे निकालानंतर जल्लोष आणि प्रतिक्रिया येत असताना दुसरीकडे शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी गुजरातच्या दिशेनं प्रयाण केलं. त्या दरम्यान शिंदे यांच्याकडे सेनेनी कसलीही चौकशी केली नाही.
एकनाथ शिंदे रात्रीच गुजरातमधील सुरतला रवाना झाले. मिळालेल्या माहितीनुसार एकनाथ शिंदेसोबत २० आमदारही आहेत. सध्या एकनाथ शिंदे हे आमदारांसह सुरतमधील’ ले मेरिडिअन’ हॉटेलमध्ये असून, २१ लोकांसाठी रुम बुक करण्यात आल्या आहेत.
दरम्यान देवेंद्र फडणवीस यामागे असल्याची माहिती असून सध्या फडणवीस दिल्लीत पोहचल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. काल मविआला धक्का देत ते आज थेट दिल्लीत पोहचले असल्याने चर्चेला उधाण आले आहे.