सध्या आगामी मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीवरून राज्याचं राजकारण तापलं आहे. मुंबई महानगर पालिका हि देशातील प्रमुख महानगरपालिकेपैकी एक आहे. या महापालिकेवर सर्वच पक्ष आपापली सत्ता स्थापन करण्यासाठी प्रयत्न करत असतात. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून या महापालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. अर्थात शिवसेनेचा बाल्लेकिल्ला आहे.
आता याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधाऱ्यांनी महापालिका निवडणुकांसाठी वॉर्डरचना केली किंवा प्रभागरचना केली तरी मुंबईसह अन्य महानगरपालिकेत आम्हाला चांगलं यश मिळेल, असा विश्वास विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. ते गोव्यात पत्रकारांशी बोलत होते. राज्य सरकारकडून वॉर्डची पुनर्रचना करण्याच्या नावाखाली आपल्याला हवे तसे वॉर्डची तोडफोड करत आहे. आम्ही निवडणूक आयोगाला तसं कळवलं आहे, पण गरज पडली तर आम्ही कोर्टातही जाऊ, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला.
शिवाय राज्यपालांनी लिहिलेल्या पत्राला मुख्यमंत्र्यांनी दिलेलं उत्तर म्हणजे मुख्यमंत्री कार्यालयाचा अपरिपक्वपणा यातून दिसतो, असा हल्लाबोल देवेंद्र फडणवीस यांनी केला. राज्यपालांचं पत्र प्रेसमध्ये दिलेलं नाही. राज्यपालांचं पत्र म्हणजे आदेश नसतो, ते कारवाई करावी असं सांगत असतात, ही आताची परिस्थिती नाही, ही परंपरागत चालत आलेली परिस्थिती आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.