मुंबई: मागील पंधरा दिवसापासून राज्यातील राजकारणात नवं नवे ट्विस्ट, धक्कातंत्र पाहायला मिळत असतांना राज्याच्या राजकारणात सोमवारी आणखी एक ट्विस्ट पाहायला मिळाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचा ‘व्हीप’ पाडला नाही म्हणून आदित्य ठाकरे यांचे नाव वागळून इतर १४ आमदारांना शिंदे गटाने नोटीसा पाठवल्या आहेत. यामुळे येणाऱ्या काळात पुन्हा राजकीय संघर्ष वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
सोमवारी बहुमत चाचणी पार पडली. या चाचणीवेळी आदित्य ठाकरे यांनीही शिंदे गटाचा व्हीप झुगारला. त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या विरोधात मतदान केलं. पण त्यांना निलंबनाची नोटीस पाठवण्यात आलेली नाही. एकनाथ शिंदे गटाचे प्रतोद असलेल्या भरत गोगावले यांनी उद्धव ठाकरेंच्या समर्थनात असलेल्या १५ पैकी १४ आमदारांना निलबंनाची नोटीस पाठवली आहे. व्हीप पाळला नाही, याबाबत ही नोटीस पाठवण्यात आली आहे. मात्र आदित्य ठाकरे यांना निलंबनाची नोटीस पाठवण्यात आलेली नाही.
सोमवारी झालेल्या बहुमत चाचणीमध्ये एकनाथ शिंदे यांनी १६४ मतं मिळवली होती. तर त्यांच्या विरोधात ९९ मतं पडली होती. आदित्य ठाकरे यांच्याबाबत बोलतना एकनाथ शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी म्हटलंय, की आम्ही आदित्य ठाकरे यांना नोटीस पाठवलेली नाही. बाळासाहेब ठाकरे यांचा आम्ही आदर करतो. याच कारणामुळे आम्ही आदित्य ठाकरे यांना नोटीस पाठवलेली नाही.
दरम्यान, आता शिवसेनेच्या उर्वरीत आमदारांवर निलंबनाची कारवाई होण्याची भीती व्यक्त केली जातेय. सोमवारी शिवसेनेच्या वतीने सुनील प्रभू यांनीही व्हीप जारी केला होता. त्यानुसार एकनाथ शिंदे यांच्याविरोधात मतदान करावं, असं व्हीपमध्ये सांगण्यात आलेलं. तर दुसरीकडे शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनीही व्हीप जारी करत एकनाथ शिंदे यांना मतदान करावं अशा सूचना दिल्या होत्या.