उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याशी संबंधित कंपन्या, साखर कारखाने आणि निकटवर्तीयांवर आयकर विभागाचे छापे पडले असतानाच भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पवार आणि त्यांच्या निकटवर्तीयांची बुधवारी आणखी एक पोलखोल करणार असल्याचे जाहीर केले. ‘अजित पवार, हसन मुश्रीफ, किशोरी पेडणेकर आणि नवाब मलिक यांच्यावर मी भ्रष्टाचाराचे आरोप केले. पण मी दिलेले पुरावे खोटे आहेत, हे सांगण्याची एकाचीही हिंमत झाली नाही’ असा दावा सोमय्या यांनी केला.
प्रसार माध्यमांशी बोलताना सोमय्या म्हणाले की, ‘यांनी इतके गैरव्यवहार केले आहेत, इतकी लूट केली आहे की मोजदाद करणे अवघड आहे, असेही त्यांनी नमूद केले. ते पुढे म्हणाले, की अजित पवारांच्या निकटवर्तीयांवर चार दिवसांपासून छापे सुरू आहेत. हा पाच हजार कोटींपेक्षा मोठा गैरव्यवहार आहे. त्यांना तुरुंगात जावेच लागेल. आपल्यावर कारवाई होईल, असे महाविकास आघाडला स्वप्नातही वाटले नसेल. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ते करून दाखविले’, असा दावाही सोमय्या यांनी केला