मराठा सेवासंघ ३२व्या वर्षात पदार्पण करत असताना आता संभाजी ब्रिगेड आणि मराठा सेवासंघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांच्या वक्तव्याने एका नव्या वादाला तोंड फोडलं आहे. संभाजी ब्रिगेडने निवडणुकीच्या तयारीला लागावं असं म्हणतानाच भाजपशी युती हाच पर्याय असल्याचं म्हटले आहे. मराठा मार्ग या मासिकाच्या सप्टेंबरच्या अंकात ही भुमिका मांडण्यात आली आहे. त्यामुळे सत्तेसाठी ब्रिगेड आपला पारंपरिक विरोध गुंडाळून ठेवत असल्याची चर्चा सुरु झाली आहे.
भांडारकर संस्थेवर हल्ला करणारी, दादोजी कोंडदेवांच्या पुतळ्याला विरोध करणारी आणि राष्ट्रवादीच्या जवळच्या मानल्या जाणाऱ्या ब्रिगेडच्या भुमिकेत सत्तेसाठी इतका बदल कसा काय होतो आहे अशी चर्चा कार्यकर्त्यांमधे रंगली आहे. दरम्यान हा ब्रिगेड मध्ये फूट पडल्यानंतर आणि फाटाफूट झाल्यानंतर राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठा हा बदल आहे का असाही सवाल विचारला जातो आहे.
पुरुषोत्तम खेडेकर यांच्या या भूमिकेनंतर आता भाजपची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पिंपरी चिंचवडमध्ये बोलताना संभाजी ब्रिगेडच्या बदलत्या भूमिकेवर भाष्य केलं. चंद्रकांत पाटील म्हणाले, पुरुषोत्तम खेडेकर यांनी मुखपत्रातून त्यांची इच्छा व्यक्त केली आहे. मराठा सेवा संघाच्या संभाजी ब्रिगेडकडून अजून तसा प्रस्तावच आलेला नसून, भाजपकडून असा कोणताही अद्यापपर्यंत निर्णय नाही. त्यांची ऑफर काय आहे हे बघूनच हा सगळा निर्णय घेतला जाईल असं पाटील म्हणाले.