कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉन (Omicron) हा निश्चितरित्या डेल्टा व्हेरियंटपेक्षा अधिक धोकादायक नाही, असे अमेरिकेतील प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. अँथनी फॉउसी यांनी म्हटले आहे. कोरोनाच्या के बी.1.1.1.529 व्हेरियंटमध्ये मोठ्या संख्येने म्युटेशन पहायला मिळत आहेत. तरीही हा व्हेरियंट जीवघेणा नाही. नव्या व्हेरियंटच्या अभ्यासातून हा कमी गंभीर स्वरुपाचा असू शकतो, असे संकेत मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. एका वृत्तसंस्थेशी बोलताना त्यांनी ओमायक्रॉन बाबत आपले मत व्यक्त केले आहे.
डॉ. फॉउसी यांनी यासाठी दक्षिण आफ्रिकेचे उदाहरण दिले आहे; जिथे ओमायक्रॉनचा पहिल्यांदा शिरकाव झाला होता. दक्षिण आफ्रिकेत ओमायक्रॉन संक्रमणाची संख्या आणि रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण डेल्टा व्हेरियंटच्या तुलनेत कमी आहे. एका विषाणू अधिक संसर्गजन्य आहे म्हणून त्यामुळे अति गंभीर आजारी अथवा मृत्यू होतील असे काही नाही, असे डॉ. फॉउसी यांनी म्हटले आहे. दुसरीकडे सिंगापूर येथील तज्ज्ञांनीदेखील स्पष्ट केले आहे की ओमायक्रॉन हा डेल्टा व्हेरियंट पेक्षा अधिक धोकादायक नसल्याचे आढळून आले आहे.