महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणी काही केल्या कमी होताना दिसत नाही. अनिल देशमुख यांच्यावर ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स यांच्या धाडी सुरुच आहेत. आज अनिल देशमुख यांच्या नागपुरातील घरावर सीबीआयने (CBI) पुन्हा छापेमारी केली. महत्वाचं म्हणजे अनिल देशमुख यांचे सुपुत्र सलील देशमुख यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आल्याची माहिती, सूत्रांनी दिली आहे. सीबीआयने छापेमारी केली, तेव्हा देशमुखांच्या घरी कोणीच नसल्याची माहिती मिळत आहे.
सीबीआयने सकाळी 8 च्या सुमारास ही छापेमारी केली. सहा-सात अधिकाऱ्यांनी देशमुखांच्या नागपुरातील घरात प्रवेश करुन झाडाझडती सुरु केली. सीबीआयच्या धाडीननंतर देशमुखांच्या घराबाहेर तणावपूर्ण शांतता दिसत आहे. घराबाहेरील गेट बंद आहे. अनिल देशमुख यांच्याविरोधात मनी लाँडरिंग आणि 100 कोटी वसुली प्रकरणात ईडी आणि सीबीआयकडून चौकशी सुरु आहे. मागील आठवड्यात मुंबई सत्र न्यायालयाने अनिल देशमुखांना नोटीस बजावून 16 नोव्हेंबरपर्यंत कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.