शिवसेना खासदार संजय राऊत हे सध्या दिल्लीमध्ये आहेत. आज सकाळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या तक्रारीवर भाष्य केले. त्याचबरोबर महाराष्ट्राप्रमाणे गोव्यातही महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करणार का? यावरही संजय राऊतांनी भाष्य केले आहे.
यावर बोलण्यासाठी थोडा वेळ लागेल. सर्वांसोबत चर्चा सुरु आहेत. इतक्या घाईघाईने मी काही सांगू शकत नाही. सर्वच पक्षांबरोबर नेहमीच चर्चा सुरु आहे. पण समोरच्या पक्षाकडून प्रस्ताव आला तर त्यावर पक्ष विस्ताराने चर्चा करेल. ज्या राज्यात आम्हाला एकत्र यायचे आहे तिथल्या लोकांसोबत चर्चा केली जाते. आतापर्यंत ही चर्चा झालेली नाही, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे.
गोव्यातही अशी आघाडी झाली तर त्याचे स्वागत आहे. नाही झाली तर आम्ही स्वबळावर लढू. आम्ही गोव्यात 22 जागांवर निवडणूक लढणार आहे. आम्ही या निवडणुकीमध्ये पूर्ण ताकदीने उतरणार आहोत. महाराष्ट्रामध्ये शिवसेना ज्या पद्धतीने काम करत आहे आम्ही त्याच पद्धतीने गोव्यात काम करु. शिवसेना आणि गोव्याचं भावनिक नातं आहे, असेही संजय राऊत म्हणाले आहेत.