शाळा सुरू करण्याच्या निर्णयाचे काय होणार? टोपे म्हणतात…
कोरोनाच्या नव्या विषाणूने पुन्हा एकदा सामान्यांना धडकी भरवायला सुरुवात केली आहे. कारण आज आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी व्यक्ती केलेली भीती आणि त्याबाबत दिलेला इशारा. सोबतच परदेशात सापडलेला नवा विषाणू, तिकडे आणि भारतातही वाढणारे कोरोना रुग्ण पाहता राज्यातील शाळा सुरू करायला आरोग्य मंत्र्यांनी तूर्तास तरी नाहरकत घेतली आहे. मात्र, केंद्र सरकारसह राज्य सरकारलाही एक मोलाचा सल्ला दिला आहे.
उद्या होणार बैठक
राजेश टोपे म्हणाले की, 1 डिसेंबरला राज्यातील शाळा सुरू करण्याचा निर्णय झाला. मात्र, आमची याला नाहरकत आहे. कारण कोरोनाचा आफ्रिकेत नवा विषाणू आढळला म्हणजे लगेच त्याचा महाराष्ट्रात परिणाम होईल असे नाही. त्यामुळे शाळा सुरू करायला आमची हरकत नाही. मात्र, शाळा सुरू करण्याबाबत उद्या व्हिडीओ कॉन्फरन्स बैठक होणार आहे. या बैठकीत अंतिम निर्णय होईल, हे सांगायलाही ते विसरले नाहीत.
लसीकरण वाढवणार
आरोग्य मंत्री म्हणाले की, आतापर्यंत 85 टक्क्यांपर्यंत लसीकरण केले आहे. आता ते 100 टक्क्यांपर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न सुरू आहे. 5 लाख लसीकरण रोज होत आहे. कोरोनात मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या जवळच्या नातेवाईकांना 50 हजारांची आर्थिक मदत देण्यात येणार आहे. आम्ही नवा विषाणू सापडल्याने दक्षिण आफ्रिकेतील विमाने बंद करण्याची विनंती केंद्र सरकारला केली आहे. मात्र, त्यांनी अभ्यास करून काय तो निर्णय घ्यावा.
तूर्तास धोका नाही
राजेश टोपे म्हणाले की, कोरोनाचा नवा सापडलेला विषाणू, लसीला निष्प्रभ करून वाढतो. याचा अभ्यास झाला आहे. हा काळजी करण्यासारखा व्हेरिएंट आहे, असा प्राथमिक अंदाज आहे. राज्य केंद्र सरकारला याबाबत पूर्ण माहिती दिली आहे. मुंबई महापालिकेचे आयुक्त चहल यांनी आफ्रिकेवरून येणारे विमान थांबवावे, अशी विनंती केली आहे. केंद्र शासन काय निर्णय घेणार याकडे आमचे लक्ष लागले आहे. मात्र, तूर्तास असा व्हेरिएंट देशात आढलेला नाही. दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या लोकांनावर लक्ष ठेवतोय. त्यांना क्वारंटाईन केले जात आहे. त्यांना 72 तासांची आरटीपीसीआर टेस्टचा रिपोर्ट बंधनकारक असल्याचे त्यांनी सांगितले.