महात्मा गांधी यांनी पंडित नेहरु यांना देशाचा नेता म्हणून निवडले हे योग्यच होतं हे सरदार पटेल यांनी स्वातंत्र्यानंतर एका वर्षातच स्पष्ट केले. मात्र काहीजण नेहरू आणि पटेल यांच्यात वाद होता असे खोटे सांगून संभ्रम निर्माण करतात. पंडित जवाहरलाल नेहरु हे त्यावेळच्या नेत्यांच्या सर्वात पुढचा विचार करणारे नेते होते, ते दूरदृष्टी असणारे नेते होते. पंडित नेहरु इतिहासात महत्वपूर्ण होते, वर्तमानात महत्वपूर्ण आहेत आणि भविष्यातही महत्वपूर्ण राहतील, असे प्रा. पुरुषोत्तम अगरवाल यांनी म्हटले आहे.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधत देशाच्या जडणघडणीत पंडित नेहरु यांचे योगदान तरुण पिढीला माहिती व्हावे याउद्देशाने प्रा. पुरुषोत्तम अगरवाल यांचे ‘नेहरु: कल आज और कल’ हे व्याख्यान टिळक भवन येथे आयोजित करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मुकुल वासनिक, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण, प्रदेश कार्याध्यक्ष शिवाजीराव मोघे, चंद्रकांत हंडोरे, नसीम खान, आ. प्रणिती शिंदे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व सहप्रभारी आशिष दुआ माजी मंत्री सुरेश शेट्टी, उल्हास पवार, प्रदेश सरचिटणीस व प्रवक्ते अतुल लोंढे आदी उपस्थित होते.
प्रा. अगरवाल आपल्या व्याख्यानात पुढे म्हणाले की, नेहरुंवर आज बोलण्याचे कारण हेच आहे की भारतीय संस्कृती व सभ्यता धोक्यात आली आहे.‘आयडिया ऑफ इंडिया’ सोडून ‘दुसरी आयडिया ऑफ इंडिया’ थोपवली जात आहे, त्याला विरोध नाही पण ते देशासाठी अत्यंत धोकादायक आहे. ‘भारत माता की जय’चा नेहरुंनी डिस्कव्हरी ऑफ इंडिया व आत्मचरित्रात उल्लेख केला आहे…परंतु आज ‘भारत मात की जय’ला धमकीच्या रुपात पाहिले जात आहे.