राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या बीड दौऱ्यादरम्यान भाजपचे ज्येष्ठ नेते आणि वैद्यनाथ कारखान्याचे उपाध्यक्ष नामदेव आघाव यांच्यासह चार जणांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. यावेळी राष्ट्रवादीचे नेते आणि कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांनी ‘माझ्याच घरातील लोकांना माझ्यातले गुण कळले नाहीत’ असे म्हणत टोलेबाजी केली आहे.
यावेळी बोलत असतांना धनंजय म्हणाले की,’मी काही जिल्ह्यामध्ये या परिवार संवाद यात्रेमध्ये जयंत पाटलांसोबत होतो. या परिवाराचे प्रमुख हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार साहेब आहेत. प्रत्येक मतदारसंघात आपला पक्ष आपला परिवार हे पाहण्यासाठी हा परिवार दौरा आहे. आमच्या पक्षातील नेते परळीत आल्यावर स्वागत असंच होणार. या अगोदर अनेक कार्यक्रम घेतले, तोच विश्वास तोच प्रेम तुम्ही माझ्यावर टाकता, ही माझ्यासाठी फार मोठी गोष्ट आहे’ असे ते म्हणाले.
पुढे बोलत असतांना ते म्हणाले की, ‘३३ पैकी ३० नगरसेवक राष्ट्रवादीचे परळीत निवडणून आणले. पंचायत समिती, सर्व स्थानिक संस्थांवर राष्ट्रवादीची पकड आहे. परळी मतदारसंघात आमची पकड मजबूत आहे. २०१४ च्या निवडणुकीत पडेल उमेदावराला पवार साहेबांनी राज्याचे विरोधीपक्ष नेते पद दिले, माझ्या घरातील लोकांना माझ्यातले गुण कळले नाहीत’ असे म्हणत त्यांनी टोलेबाजीही केली.
दरम्यान, ‘ज्या पक्षांनी माझ्यावर विश्वास टाकला ती परळी आज राष्ट्रवादीचा बालेकिल्ला केला. माझ्यासमोर मोठी ताकद होती, वारसा होता. वैद्यनाथ कारखाना ताब्यात घेऊ शकतो मात्र आपल्याला तसं करायचं नाही. लढाई करूनच ताब्यात घेऊ. मला कोणी समुद्र मागितला तर तुमच्यासाठी मी नाही म्हणू शकत नाही’ असेही ते म्हणाले.