ब्रिटनची महाराणी, ९५ वर्षीय एलिझाबेथ (द्वितीय) यांच्या निधनानंतर अंतिम संस्कार योजनेसंदर्भात तयार केलेल्या फाईलमधील कागदपत्रे लिक झाल्याने शाही परिवाराला धक्का बसला आहे.
ब्रिटन मध्ये सत्तेवर असलेला राजा किंवा राणी यांच्या मृत्यूपूर्वीच अंत्यसंस्कार योजना आखण्याची परंपरा असून राजा किंवा राणीच्या मृत्यू पश्चात योजनेला ‘ लंडन ब्रीज इस फॉलिंग डाऊन’ म्हटले जाते.
महाराणीच्या निधनानंतर काही तासात आणि काही दिवसात कोणते कार्यक्रम होणार याची योजना तयार असून त्यातील काही माहिती लिक झाली आहे.
याला ऑपरेशन लंडन ब्रीज असे नाव दिले गेले आहे.
लिक झालेल्या माहितीनुसार निधनानंतर राणीचे १० दिवसांनी दफन केले जाणार आहे.
राणीवर अंतिम संस्कार होण्यापूर्वी प्रिन्स चार्ल्स ब्रिटनची सत्ता असलेल्या चार देशाचा दौरा करणार आहेत.
राणीचे पार्थिव तीन दिवस संसद भवनात अंतिम दर्शनासाठी ठेवले जाणार आहे.
यावेळी हजारोंच्या संख्येने लोक लंडन मध्ये येतील आणि त्यामुळे कायदा, सुव्यवस्था तसेच भोजनाची कमतरता जाणवू शकेल असा अंदाज असून या काळात गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि सुरक्षेसाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस तैनात केले जाणार आहेत.
पीटीआयच्या बातमीनुसार राणीच्या निधनानंतर राष्ट्रीय शोक म्हणून एक दिवसाची सुटी दिली जाईल. द. गार्डियनने २०१७ मध्ये ऑपरेशन लंडन ब्रीज संदर्भात एक लेख प्रकाशित केला होता. त्यानुसार राणीच्या नंतर प्रिन्स चार्ल्स याना राजमुकुट मिळेल.
ऑपरेशन लंडन ब्रीज संदर्भात लिक झालेली कागदपत्रे अमेरिकी न्यूज संस्था पॉलीटीको च्या हाती लागल्याचे सांगितले जात आहे.