अधिकारी म्हणतात हे तर फोर्टिफाईड तांदूळ
अंगणवाडीमध्ये एकात्मिक बाल विकास प्रकल्प अंतर्गत दिला जाणाऱ्या पोषण आहारात प्लास्टिकचे तांदूळ आढळून आल्याची माहिती आहे. त्यामुळे ग्रामीण भागात नागरिकांमध्ये संभ्रम आहे. तर पोषण आहारातील तांदूळ प्लास्टिकचा नसून फोर्टिफाईड तांदूळ असून तो आरोग्य वर्धकच असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं.
भंडारा जिल्ह्यातील अंगणवाडी मध्ये 3 ते 6 वयोगटातील बालकांना एकात्मिक बाल प्रकल्प विभागाकडून देण्यात येणाऱ्या पोषण आहाराच्या पाकीटमध्ये प्लास्टिकचे तांदूळ आढळून आल्याने नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. नेमका प्लास्टिक तांदूळ काय प्रकार आहे या संदर्भात गावातील नागरिकांमध्ये संभ्रमात आहे.
महाराष्ट्र सरकार लहान मुलांच्या जीवाशी खेळ करत असल्याचा गावकऱ्यांचा आरोप
महाराष्ट्र शासनाच्या एकात्मिक बाल प्रकल्प विभागा तर्फे 3 ते 6 वयोगटातील बालकांना आणि गरोदर मातांना योग्य पोषण आहार मिळावा करिता अंगणवाडीच्या माध्यमातून शासन लहान मुलांना पोषण आहाराचे पाकीट देत आहे. यामध्ये मटकी, गहू, मसूर दाळ, चणा, खाद्यतेल, मीठ, हळद, तांदूळ असे देत आहे. तर मोहाडी तालुक्यातील खमारी बुजरुक गावात अंगणवाडीत पोषण आहार आला असताना गावातील लाभार्त्यांनी पोषण आहाराचे पाकीट घरी घेऊन गेले आणि तांदळाला शिजवित असताना काही तांदळाचे दाणे शिजले नाही. त्यामुळे महिलांनी तांदळाची बारकाईने पाहणी केली असताना त्यात प्लास्टिक सारखे तांदूळ असल्याचे आढळून आले. ही बातमी संपूर्ण गावात पसरली आणि लोकांनी ते तांदूळ खाल्लेच नाही, तर महाराष्ट्र सरकार लहान मुलांच्या जीवाशी खेळ करत असल्याचा आरोपही गावकऱ्यांनी केला आहे.
हे तांदूळ प्लास्टिकचे नाही तर फोर्टिफाईड तांदूळ असल्याची अधिकाऱ्यांची माहिती
तर ह्या प्लास्टिकच्या तांदळाची सत्य परिस्थिती तपासण्यासाठी आमचे प्रतिनिधी जेव्हा एकात्मिक बाल प्रकल्प कार्यालयात पोहचले आणि अधिकाऱ्यांची विचारणा केली असताना हे तांदूळ प्लास्टिकचे नाही हे सांगण्यात आले. हूबेहून प्लास्टिक सारखेच दिसतात, शिजत पण नाही मग काय तर हे तांदूळ फोर्टिफाईड तांदूळ आहेत, प्रति किलोमध्ये 10 ग्राम फोर्टिफाईड तांदूळ मिश्रित केला गेला आहे. लाभार्थ्यांच्या आहारामधील सूक्ष्म पोषकतत्वांची कमतरता भरुन काढण्याकरीता फोर्टिफाईड तांदूळ देण्यात येत आहे.