अमेरिकेने अफगाणिस्तान, काबुल विमानतळाबाहेर उपस्थित असलेल्या आपल्या नागरिकांना तेथून त्वरित सुरक्षित ठिकाणी जाण्यास सांगितले आहे. काबुल विमानतळाबाहेर उभ्या असलेल्या अमेरिकेच्या तसेच इतर नारिकांवर दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता अमेरिकेने वर्तवली आहे. म्हणूनच अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाने अफगाणिस्तानमध्ये उपस्थित असलेल्या आपल्या नागरिकांना सावध केले आहे. काबूलमधील अमेरिकन दूतावासाने म्हटले आहे की जे विमानतळाच्या एबी गेट, ईस्ट गेट आणि उत्तर गेटवर उपस्थित आहेत, त्यांनी त्वरित निघून जावे. अमेरिकेने आधीच दहशत व्यक्त केली होती की दहशतवादी कधीही ‘एयरपोर्ट’वर हल्ला करू शकतात.
उल्लेखनीय म्हणजे, काबूल विमानतळाची सुरक्षा पूर्णपणे अमेरिकन सैन्याने ताब्यात घेतली आहे. तालिबानने 15 ऑगस्ट रोजी काबूलवर कब्जा केल्यानंतर देश सोडून जाणाऱ्या लोकांचा मोठा जमाव विमानतळावर जमला. यामुळे तेथे येणाऱ्या बचाव विमानांना लँडिंग आणि उड्डाण करताना अडचणींचा सामना करावा लागला. या गोंधळामुळे विमानतळावरून विमानांची हालचाल काही काळ थांबली होती.