मुंबई: जुन्या वादातून, ब्लॅकमेल करण्याच्या हेतूने किंवा इतर कारणांवरुन पोलीस ठाण्यात पॉक्सो किंवा विनयभंगाची तक्रार दाखल केली जाते. या गुन्ह्यात पोलिसांकडून कोणतीही शाहनिशा न करता आरोपीला अटकही केली जाते.
मात्र, तपासादरम्यान तक्रार खोटी असल्याचे निष्पन्न होते अन् आरोपीला सोडून दिले जाते. मात्र, यामध्ये त्या व्यक्तीची समाजात नाहक बदनामी होते. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी महत्वाचा निर्णय घेतला आहे.
पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी एक कार्यालयीन आदेश काढला असून यामध्ये त्यांनी पॉक्सो, विनयभंगाचे गुन्हे दाखल करताना पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याची परवानगी घ्यावी असे आदेशात नमूद केले आहे.
पॉक्सो कायद्याच्या होणाऱ्या गैरवापरामुळे मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी हा निर्णय घेतला आहे. जुन्या भांडणाच्या कारणावरून, प्रॉपर्टीच्या वादावरुन, पैशाच्या देण्या घेण्यावरुन किंवा वैयक्तिक कारणावरुन पोलीस ठाण्यामध्ये पॉक्सो कायद्यांतर्गत किंवा विनयभंगाची तक्रार केली जाते. खोट्या गुन्ह्यांमुळे निर्दोष व्यक्तींची नाहक बदनामी रोखणे हा देखील या मागचा उद्देश असल्याचे पांडे यांनी सांगितले.
या गुन्ह्यात कोणतीही शाहनिशा न करता आरोपीला तात्काळ अटक केली जाते. मात्र, तपासादरम्यान केलेली तक्रार खोटी असल्याचे निष्पन्न होते आणि आरोपीला कलम 169 सीआरपीसी अंतर्गत डिस्चार्ज करण्याची कारवाई केली जाते. तोपर्यंत बराच उशीर झालेला असतो. अटकेमुळे आरोपीची नाहक बदनामी होते, समाजातील त्याच्या प्रतिष्ठेला धक्का लागतो आणि मोठ्या प्रमाणावर आरोपीचे वैयक्तिक नुकसान होते. खोट्या तक्रारींची वाढती संख्या लक्षात घेता अशा खोट्या तक्रारींना आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्तांनी कार्यालयीन आदेश जारी केला आहे.