स्किन टू स्किन टच प्रकरण
नवी दिल्ली : पॉक्सो (POCSO) कायद्यांतर्गत स्किन टू स्किन टच प्रकरणात वादग्रस्त निकाल देऊन प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या मुंबई उच्च न्यायालयाच्या अतिरिक्त महिला न्यायाधीश पुष्पा गनेडीवाला यांचा राजीनामा मंजूर झाला आहे. राष्ट्रपतींनी त्यांचा राजीनामा स्वीकारला आहे. कायदा आणि न्याय मंत्रालयाने गनेडीवाला यांच्या अधिकृत राजीनाम्याच्या वृत्ताला दुजोरा देणारी अधिसूचना जारी केली आहे. गनेडीवाला यांनी दिलेल्या निकालावर कायदे वर्तुळात तसेच महिला सुरक्षेसंबंधी तज्ज्ञ मंडळींनी चिंता व्यक्त केली होती. नंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतर गनेडीवाला यांच्या निकालावर न्यायालयाने ताशेरे ओढत तो वादग्रस्त निकाल रद्द केला होता.
कायदा आणि न्याय मंत्रालयाने जारी केले निवेदन
न्यायाधीश गनेडीवाला यांच्या राजीनाम्यासंदर्भात कायदा आणि न्याय मंत्रालयाने एक निवेदन जारी केले आहे. न्यायाधीश गनेडीवाला यांनी 11 मार्च 2022 पासून घटनेच्या कलम 217 च्या कलम (1) च्या तरतुदी (ए) अंतर्गत अतिरिक्त न्यायाधीश पदाचा राजीनामा दिला आहे. न्यायाधीश गनेडीवाला यांनी त्यांचा कार्यकाळ पूर्ण होण्याच्या एक दिवस आधी 12 फेब्रुवारी रोजी राजीनामा दिला होता. सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने कायम न्यायाधीश म्हणून न्यायाधीश गनेडीवाला यांच्या नावाची शिफारस न करण्याचा निर्णय घेतला होता.