नवी दिल्ली: आज राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) तर्फे झारखंडच्या माजी राज्यपाल द्रोपदी मुर्मू आणि विरोधी पक्षांकडून माजी अर्थमंत्र यशवंत सिन्हा हे निवडणुकीच्या रिंगणात होते. देशातील आमदार, खासदारांनी या निवडणुकीसाठी मतदान केले होते. सत्ताधारी भाजप आघाडीकडे 50 टक्क्यांहून अधिक मते असल्याने द्रौपदी मुर्मू यांचा विजय निश्चित मानला जात आहे.
द्रौपदी मुर्मू, यशवंत सिन्हा यांच्यातून कोण जिंकणार?
राष्ट्रपती हे देशाचे प्रथम नागरिक असतात. भारतातील सर्वोच्च पद असलेले राष्ट्रपती हेच केंद्र सरकारचे प्रमुख असतात. या पदासाठी 18 जुलैला देशभरात मतदान झाले. लोकसभा, विधानसभेतील खासदार तसेच, देशातील विविध राज्यांतील विधिमंडळातील आमदारांनी या निवडणुकीसाठी मतदान केले. माजी राज्यपाल द्रौपदी मुर्मू या सत्ताधारी भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वातील एनडीएच्या उमेदवार आहेत. तर विरोधी पक्षांकडून माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. लोकसभा, राज्यसभा आणि विविध राज्यातील आमदारांच्या संख्याबळाचा विचार करता द्रौपदी मुर्मू यांचा विजय होईल असे मानले जात आहे.