राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरामध्ये पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हावा यादृष्टीने नागपूर महानगपालिकेद्वारे महत्वपूर्ण आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. मनपाच्या आदेशानुसार शहरातील सर्व तलावांमध्ये गणेश मूर्ती विसर्जनास प्रतिबंध लावण्यात आले असून मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच करता येणार आहे.
याशिवाय पीओपी मूर्तींच्या खरेदी व विक्रीवर बंदी असूनही त्याची विक्री करण्यात आल्यास संबंधित विक्रेत्यावर जप्तीची दंडात्मक कारवाईसुद्धा केली जाईल. यासंदर्भात मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त राजेश भगत यांनी आदेश निर्गमित केले. गणेशोत्सवाच्या तयारी संदर्भात झालेल्या बैठकीमध्ये महापौर दयाशंकर तिवारी यांनी दिलेल्या निर्देशान्वये मनपा प्रशासनाद्वारे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.
पर्यावरण पूरक गणेशोत्सव
शहरात पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा व्हावा यादृष्टीने मनपा प्रशासनाद्वारे तयारी सुरू आहे. त्यादृष्टीने प्रत्येक झोनमध्ये गणेश मूर्तींच्या विसर्जनाकरिता कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात येणार आहे. याशिवाय फिरते कृत्रिम टँकही झोनद्वारे नागरिकांच्या सुविधेसाठी असणार आहेत. सार्वजनिक गणेशोत्सवस्थळी व घरगुती गणेश मूर्तींच्या निर्माल्य संकलानासाठी स्वतंत्र वाहनांची व्यवस्था कचरा संकलन एजन्सीद्वारे करण्यात येणार आहे.
पीओपी मूर्तींच्या प्रतिबंधासह श्रीगणेशाच्या सजावटीकरिता प्लॉस्टिक आणि थर्मोकॉलच्या वापरासुद्धा पूर्णत: प्रतिबंध लावण्यात आले आहे. तसेच नागरिकांनी बंदी असलेल्या कुठल्याही वस्तूंचा सजावटींकरिता वापर करू नये, शक्यतोवर घरगुती गणेशाचे विसर्जन घरीच करावे, असे आवाहनही मनपातर्फे करण्यात आले आहे. ज्या झोनमध्ये सर्वाधिक घरगुती विसर्जन केले जाईल, अशा तीन झोनची निवड करून त्यांना मनपाद्वारे पुरस्कृत केले जाईल.