नागपूर: दक्षिण नागपूर हा अत्यंत मध्यम वर्गीय नागरिकांचा मतदार संघ म्हणून ओळखल्या जातो. या मतदारसंघात अनेक युवक युवती यांच्या आर्थिक परिस्थिती / क्षमतेनुसार शिक्षण घेत असतात. या मतदारसंघांचे आमदार मोहन मते यांनी प्रवास, पाहणी केली असता अनेक सुशिक्षित तरुण, उच्च शिक्षित असून त्यांच्या हाताशी काम नाही. या अनुषंगाने युवक युवती सोबत प्रत्यक्ष चर्चा केली असता अनेक खाजगी कंपनी मध्ये कामाच्या संधी असून सुद्धा या युवकांना संधी दिली जात नाही, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
त्यामुळे आमदार मोहन मतेंनी याची दखल घेऊन विदर्भातील नामांकित खाजगी कंपनी मालकांसोबत व्यक्तीशः भेटून चर्चा करून दक्षिण नागपूरच्या युवकांना त्यांचा व्यवसायात सेवेची संधी देण्याबाबत चर्चा केली. हि चर्चा सकारात्मक होऊन या कंपनीतील मनुष्यबळ हाताळणारे अधिकारी यांच्या सोबत सत्र आयोजित करण्याबाबत एकमत झाले.
या अनुषंगाने दि. ९ जानेवारी रोजी, रामदासपेठ हॉटेल सेंटर पोईट नागपूर येथे ” HR & BUSINESS MEET” याबैठकीचे आयोजन करण्यात आले. बैठकीत नागपूर तसेच विदर्भातून एकूण १०० पेक्षा अधिक खाजगी कंपनीचे अधिकारी उपस्थित होते. तसेच त्यांनीं दक्षिण नागपुरातील युवकांना नौकरीची संधी देण्याचे आश्वासन दिले. या चर्चा सत्राचे आयोजन करण्यात महत्वाची भूमिका माध्यम लोकसेवा प्रतिष्ठान व सहकारी यांनी परिश्रम घेतले.