राज्यातील ७१ साहित्यिक ‘साहित्यगंध’ पुरस्काराचे मानकरी
महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या, तसेच मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्थेचे मुख्य कार्यक्षेत्र असलेल्या नागपूरमध्ये दि. १२ डिसेंबर २०२१ रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर, संस्कृतिक भवन, ऊरूवेला कॉलनी, वर्धा रोड येथे संस्थेच्या वतीने “राज्यस्तरीय कविसंमेलन, पुस्तक प्रकाशन सोहळा, राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार वितरण व ‘साहित्यगंध दिवाळी विशेषांक” लोकार्पण सोहळा संस्थेचे अध्यक्ष, संस्थापक व साहित्यगंध दिवाळी अंकाचे मुख्य संपादक राहुल पाटील व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
आयोजित राज्यस्तरीय प्रकाशन समारंभास अतिथी संपादक व प्रमुख मार्गदर्शक प्रा. आनंद मांजरखेडे, अध्यक्ष प्रसिद्ध कवी सुधाकर भुरके, नागपूर, मा. प्रा.अभय कुलकर्णी, मराठीचे शिलेदार समूहाचे संस्थापक मा. राहुल पाटील, मा. प्रशांत ठाकरे, सिलवासा उपस्थित होते. महापुरुषांच्या प्रतिमा पूजनानंतर संपादक राहुल पाटील यांनी संस्थेची वाटचाल व मराठीचे शिलेदार व्हाट्स एप समूहाचे कार्य विशद करीत साहित्यगंध निर्मिती मागची संकल्पना आपल्या प्रास्ताविकात मांडली. उपस्थित मान्यवरांचे सन्मानचिन्ह व पुष्प देऊन संस्थेच्या वतीने स्वागत सत्कार करण्यात आला. समूहाच्या प्रशासिका तसेच साहित्यगंधच्या कार्यकारी संपादिका यांनी दिवाळी अंकासाठी संपादकीय मंडळानी घेतलेल्या परीश्रमाबद्दल विवेचन केले. तद्वतच सर्व उपस्थित सारस्वतांच्या समक्ष मान्यवरांच्या हस्ते ‘साहित्यगंध’ दिवाळी अंकाचे थाटात प्रकाशन करण्यात आले.
यावेळी कवयित्री अर्चना सरोदे सिलवासा यांच्या ‘निखारा’ व कवी स्व. अविनाश काळे यांच्या ‘अवाका’ या कवितासंग्रहाचे प्रकाशन राहुल पाटील व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच नागपूर येथील प्रसिद्ध कवयित्री तसेच चित्रपट निर्माती ‘प्राजक्ता खांडेकर’ यांच्या ‘कस्तुरीगंंध, ‘प्राजक्तगंध’, आणि ‘बटुळगंध’ या तीन ‘ई’ काव्यसंग्रहाचे व शिवाजी नामपल्ले, लातूर यांच्या ‘आधारवड’ या ई काव्यसंग्रहाचे लोकार्पण मान्यवरांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाले. याप्रसंगी नागपूर जि.प. चे आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त ‘राजू नवनागे’ व ‘आम्रपाली नवनागे’ यांच्यातर्फे साहित्यगंधच्या कार्यकारी संपादिका सविता पाटील ठाकरे, सिलवासा यांचा साडी चोळी देऊन सन्मान करण्यात आला. तसेच साहित्यगंध अंकाच्या मुखपृष्ठावर प्रकाशित केलेले छायाचित्र कु. अंकिता ठाकरे, नाशिक यांचा पुरस्कार व सन्मान आई वडील या नात्याने मा.प्रशांत ठाकरे व सविता पाटील ठाकरे यांनी स्वीकारला.
कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक प्रा. आनंद मांजरखेडे यांनी आपल्या भाषणात ‘मराठी भाषा संशोधन मंडळ’ स्थापन करण्याचा मानस बोलून दाखवला. प्रमुख अतिथी प्रशांत ठाकरे, प्रा. अभय कुलकर्णी यांनीही याप्रसंगी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात ज्येष्ठ कवी सुधाकर भुरके यांनी नवोक्रमास शुभेच्छा देत या हक्काच्या व्यासपीठावर अधिकाधिक दर्जेदार लेखन करण्यासाठी मनोभावे शुभेच्छा दिल्यात. कार्यक्रमाचे बहारदार सूत्र संचालन कार्यकारी संपादिका सविता पाटील ठाकरे यांनी केले तर आभार कवयित्री प्रा. तारका रूखमोडे यांनी मानले. या समारंभात ७१ साहित्यिकांना ‘साहित्यगंध २०२१’ हा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. कवी संमेलन व लोकार्पण समारंभास महाराष्ट्रातून व शेजारील राज्यातून आलेले आणि कवी आणि कवयित्री मोठ्या संख्येने उपस्थित होते.