नागपूर : उत्तर अंबाझरी मार्गावरील सेवासदन संस्थेच्या माई मोतलग स्मृति सभागृहात ‘जिव्हाळा वृत्त २०२२’ चे प्रकाशन व पुरस्कार वितरण सोहळा सोमवारी उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नागपूर महानगर सहसंघचालक श्रीधर गाडगे व प्रमुख पाहुणे म्हणून सेवासदन संस्थेच्या अध्यक्ष कांचन गडकरी, दानपारमिता (जिव्हाळा) चे अध्यक्ष भन्ते डॉ. मेत्तानंद चिंताळ उपस्थित होते. व्यासपीठावर होमिओपॅथी डॉ. विलास डांगरे प्रामुख्याने उपस्थित होते.
याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विवेक साप्ताहिक प्रकाशित आणि रवींद्र देशपांडे लिखित ‘कर्तव्यभूमीचे पूजारी श्री विलासजी फडणवीस’ व ‘जिव्हाळा वृत्त २०२२’ चे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी विलास फडणवीस स्मृतिप्रीत्यर्थ जिव्हाळा पुरस्कार जनकल्याण समितीला देण्यात आला. समितीचे अध्यक्ष सुमन पुणतांबेकर यांनी पुरस्कार स्वीकारला. तर रघुनाथ ढोले व डॉ. कुसुम ढोले स्मृतिप्रीत्यर्थ जिव्हाळा पुरस्कार यवतमाळच्या तेजस्विनी छात्रावास यांना देण्यात आला. छात्रावासाच्या अध्यक्ष सुलभा गौड यांनी हा पुरस्कार स्वीकारला. दोन्ही पुरस्काराची रक्कम प्रत्येकी एक लाख रुपये अशी आहे. दोन्ही पुरस्कारप्राप्त संस्थांना एक लाख रुपयाचा धनादेश देण्यात आला.
अनाथांच्या आई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ज्येष्ठ समाजसेविका सिंधूताई सपकाळ यांना डॉ. विलास डांगरे यांनी श्रद्धांजली अर्पण केली. त्यांनी कसा संघर्ष केला हे त्यांनी सांगितले. कांचन गडकरी यांनी दिवंगत विलास फडणवीस यांच्याकडे एकदा गेलेला कार्यकर्ता त्यांच्याच घरातील होऊन जाईल इतके आपुलकीचे संबंध त्यांच्याकडे गेल्यानंतर तयार व्हायचे असे सांगितले, भन्ते डॉ. मेत्तानंद चिंचाळ यांनी जिव्हाळा परिवारात असे व्यक्तिमत्त्व होणे नाही, असे प्रतिपादन केले. श्रीधर गाडगे यांनी विलासजींनी कार्यकर्ते घडवल्याचे सांगितले. पुरस्कारामागील पार्श्वभूमी सांगताना कार्याध्यक्ष अविनाश संगवई यांनी दिवंगत विलास फडणवीस यांच्या जन्मदिनी पुस्तक प्रकाशन होत असून हा दुग्धर्शकरा योग असल्याचे सांगितले.