४८ वर्षीय द्रविड सध्या बंगळुरुमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचं काम पाहत असून यापूर्वीही तो श्रीलंकेच्या दौऱ्यावर आहे. बीसीसीआयने यासंदर्भातील हलचाली सुरु केल्याची माहिती समोर येत आहे.
भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकदामीचा कारभार पाहणारा राहुल द्रविडवर भारतीय क्रिकेट नियमक मंडळ म्हणजेच बीसीसीआय मोठी जबाबदारी टाकण्याच्या तयारीत आहे. भारतामध्ये होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी राहुल द्रविडने तात्पुरत्या स्वरुपात भारतीय संघाचं प्रशिक्षक पद संभाळावं यासाठी बीसीसीआय प्रस्ताव पाठवण्याच्या तयारीत आहे. सध्याचे प्रशिक्षक रवी शास्त्री आणि इतर सहाय्यक प्रशिक्षक टी २० विश्वचषकानंतर आपली पदं सोडणार आहेत. त्यामुळेच राहुल द्रविड सारख्या विश्वासू व्यक्तीवर संघाची जबाबदारी सोपवण्यासाठी बीसीसीआयने पावलं उचलण्यास सुरुवात केलीय.
ऑस्ट्रेलियातील काही प्रशिक्षकांनी भारतीय प्रशिक्षक होण्यासंदर्भातील इच्छा व्यक्त केली आहे. मात्र बीसीसीआयकडून भारतीय प्रशिक्षकाला प्राधान्य क्रम दिला जाणार आहे. भारतीय प्रशिक्षकाची नेमणूक करण्यासंदर्भात सकारात्मक काही घडलं नाही तर परदेशी प्रशिक्षकांचा विचार केला जाणार आहे. द्रविडने पूर्णवेळ प्रशिक्षक व्हावं अशी बीसीसीआयची इच्छा आहे. यासाठी बीसीसीआयने द्रविडला प्रशिक्षक पदासाठी अर्ज करण्याची विनंती केल्याची माहिती समोर आलीय. मात्र द्रविडने ही विनंती नाकारलीय. आपल्याला एवढा प्रवास करण्याची इच्छा नसल्याचं द्रविडने स्पष्ट केलं आहे.
“आम्हाला असा उमेदवार हवा आहे की जो या कामासाठी अगदी योग्य असेल. आम्हाला अशी परिस्थिती नकोय की अनेक अर्ज आलेत पण कोणीही योग्य नाही असं व्हायला नको. अनेक उमेदवार असले आणि असं झाल्यास ते आमच्यासाठी लज्जास्पद ठरेल. त्यामुळे योग्य उमेदवार शोधण्यास आमचं प्राधान्य राहील. तोपर्यंत द्रविडलाच आम्ही तात्पुरता प्रशिक्षक म्हणून पाहत आहोत,” असं बीसीसीआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.