भारतीय राजकारणावर पुढील अनेक दशके भाजपचे वर्चस्व राहणार आहे आणि मोदी युग संपण्याची वाट पाहणे ही काँग्रेस नेते राहुल गांधी यांची चूक असल्याचे निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी म्हटले आहे. गोव्याच्या दौऱ्यावर असताना प्रशांत किशोर यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. प्रशांत किशोर यांनी स्पष्टपणे सांगितले की, पुढील अनेक दशके त्यांना भाजपशी लढावे लागणार आहे. सध्या बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासाठी प्रशांत किशोर काम करत आहेत.
तृणमूलने वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या बंगाल विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर किशोर यांनी ममता बॅनर्जींसोबत काम करत नसल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर, प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये प्रवेश करू शकतात अशा बातम्याही आल्या होत्या, पण चर्चेच्या अनेक फेऱ्यांनंतर आता प्रशांत किशोर पुन्हा एकदा तृणमूलसोबत काम करत आहेत. आगामी गोवा विधानसभा निवडणुकीपूर्वी तृणमूलसाठी गोव्यात पोहोचले आहेत.
प्रशांत किशोर यांनी अनेक दशके भाजपच्या वर्चस्वाचा अंदाज वर्तवण्याबरोबरच राहुल गांधींचीही खिल्ली उडवली आणि म्हणाले की, भाजप केवळ मोदी लाटेपर्यंतच सत्तेत राहणार आहे या भ्रमात राहुल गांधी आहेत.