महाराष्ट्रात सध्या ईडीच्या रडारवर राज्यातील अनेक मंत्री आहेत. नुकतेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तीयांच्या साखर कारखान्यावर आयकर विभागाने धाड टाकली आहे. दौंड शुगर, अंबालिका शुगर्स, जरंडेश्वर साखर, पुष्पदनतेश्वर शुगर, नंदुरबार या खासगी साखर कारखान्यांच्या संचालकांच्या घरावर कारवाई सुरू करण्यात आली आहे.
केंद्रीय यंत्रणांनी सकाळी सात वाजल्यापासून छापेमारी सुरू केली आहे. ज्या साखर कारखान्यांच्या संचालकांच्या घरावर इन्कम टॅक्स विभागाची छापेमारी होत आहे ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जवळची लोकं आहेत. अजित पवारांनीही आयकर विभागाच्या कारवाईला दुजोरा दिला आहे.
मुंबई, पुणे आणि नागपूरमध्ये आयकर विभागाकडून धाडी टाकण्यात आल्याचे सूत्रांनी म्हटलं आहे. दोन महिन्यांपूर्वी ईडीनं जरंडेश्वर साखर कारखान्याची मालमत्ता सील केली होती. या कारवाई नंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्यावर होत असलेल्या आरोपांना उत्तरं दिली होती. ‘जरंडेश्वर कारखान्याच्या विक्री प्रक्रियेशी संबंध नसल्याचं सांगत मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कारखान्याची विक्री झाली आहे. कारखाना व्यवस्थित सुरू आहे. त्यामुळं कारखान्याचं संचालक मंडळ ईडीच्या कारवाईला न्यायालयात आव्हान देईल,’ असे देखील अजित पवार म्हणाले.
इन्कम टॅक्स विभागाकडून सुरू असलेल्या या छापेमारी मध्ये पुणे जिल्ह्यातील दौंड परिसर, कर्जत, नंदुरबार परिसराचा समावेश आहे. या छापेमारी दरम्यान इन्कम टॅक्स विभागाने सीआरपीएफच्या जवानांची देखील सुरक्षेसाठी मदत घेतली असल्याचं सांगण्यात आले आहे.