८ ते ११ ऑगस्ट दरम्यान अतिवृष्टीचा ईशारा; जिल्हाधिकारी
नागपूर: भारतीय हवामान खात्याने नागपूर जिल्ह्यात दिनांक ८ ते ११ ऑगस्ट, २०२२ या कालावधीमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवलेली आहे व दिनांक ८ व ९ ऑगस्ट, २०२२ या दोन दिवसाकरीता ऑरेंज अलर्ट जारी केला असून या दिवशी अत्यंत मुसळधार पाऊसाचा इशारा दिलेला आहे.
या कालावधीमध्ये पावसासोबतच वादळीवारा व विज पडण्याची शक्यता देखील भारतीय हवामान खात्याने वर्तवलेली आहे. सद्यस्थितीत नागपूर जिल्ह्यातील मोठे धरण तोतलाडोह (रामटेक) ८८%, नवेगाव खैरी – ( पारशिवणी ) ९९%, खिंडशी (रामटेक) ९६%, वडगाव (उमरेड) १००% क्षमतेने भरलेले आहे. मध्यम – प्रकल्प जसे वेणा (नागपूर ग्रामीण), कान्होलीबारा (हिंगणा), पांढराबोडी (उमरेड), मकरधोकडा (उमरेड), सायकी (उमरेड), चंद्रभागा (काटोल), मोरधाम (कळमेश्वर), केसरनाला ( कळमेश्वर), उमरी (सावनेर), कॉलार (सावनेर), खेकडानाला (सावनेर) व जाम (काटोल) हे १०० टक्के भारलेले असून या ठिकाणी सांडव्या वरून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तसेच जिल्ह्यातील जवळपास सर्वच लघु प्रकल्प १०० टक्कांनी भरलेले असून त्याठिकाणी देखील सांडव्यावरून पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
पेंच नदीवरील मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यात असलेले चौरई धरण देखील ८५% भरलेले असून या कालावधी मध्ये छिंदवाडा जिल्ह्यात अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे व दिनांक १० ऑगस्ट, २०२२ रोजी रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. या कारणास्तव या कालावधीमध्ये चौरई धरणातून पाण्याचा अतिविसर्ग होवून तोतलाडोह व नवेगाव खैरी या धरणामध्ये अधिक पाणी येवून पेंच व कन्हान नदीला मोठा पूर येण्याची शक्यता आहे. या वर्षी वीज पडल्यामुळे १२ व्यक्तींना तर पुरामध्ये वाहून व नदी / नाल्याच्या पाण्यामध्ये बुडून १७ व्यक्तींना आपला जीव गमवावा लागलेला आहे.
वरील परिस्थिती लक्षात घेता नागपूर जिल्ह्यातील नागरीकांना सतर्कतेचा ईशारा देण्यात येत असून नागरीकांनी आवश्यक काळजी घेवून स्वरक्षण करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी नागपूर यांच्यातर्फे करण्यात येत आहे. विज गर्जना होत असताना शक्यतो घरातच राहणे आवश्यक आहे. शेतात कामाला जात असताना अशा कालावधीमध्ये मोबाईल फोन सोबत बाळगू नये. वीज गर्जना सुरू असताना घरातील इलेक्ट्रिकल उपकरणे बंद ठेवावी. अतिवृष्टी व वीज गर्जना होत असताना चुकूनही झाडाच्या खाली उभे राहू नये. सद्यस्थितीत नागपूर जिल्ह्यातील बहुतांश नदी व नाले दुथडी भरून वाहत असून पुलावरून पाणी वाहत असल्यास वाहनाद्वारे अथवा कोणत्याही पद्धतीने पुल पार करण्याचा प्रयत्न करू नये. अशा प्रकारच्या सूचना नागरिकांना देण्यात आल्या आहेत.