28 जणांचा मृत्यू, 200 रेल्वे गाड्या रद्द
मागील काही दिवसांपासून दक्षिण भारतातील काही राज्यांमध्ये पावसाने हाहाकार माजवला आहे. या राज्यांमध्ये आंध्र प्रदेशला सर्वाधिक फटका बसला आहे. आंध्र प्रदेशात पावसाशी संबंधित घटनांमध्ये सर्वाधिक जीवित व वित्तहानी झाली. दरम्यान रेल्वे विभागाने 200 गाड्या रद्द केल्या आहेत
रविवारी तामिळनाडू, कर्नाटक आणि रायलसीमाच्या बहुतांश भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर केरळ, तामिळनाडू, अंदमान आणि निकोबार बेटे, किनारी आंध्र प्रदेश, दक्षिण छत्तीसगड, कोकण, गोवा, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि तेलंगणा येथे मध्यम स्वरुपाचा पाऊस पडू शकतो, अशी माहिती स्कायमेटने दिली आहे. यासोबतच ओडिशा, लक्षद्वीप, मध्य प्रदेश आणि गुजरातच्या काही भागात पावसाची शक्यता आहे.
अतिवृष्टीमुळे 28 ठार, 17 हून अधिक बेपत्ता
केरळच्या सबरीमालामध्ये पावसाचे प्रमाण कमी झाले आहे, पथनामथिट्टा जिल्हा प्रशासनाने पावसामुळे तीर्थयात्रेवरील बंदी उठवली आहे. तामिळनाडू आणि पुद्दुचेरीच्या अनेक भागांमध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. दुसरीकडे, आंध्र प्रदेशातील कडप्पा आणि अनंतपुरमु जिल्ह्यात शुक्रवारपासून पावसामुळे किमान 28 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर पावसामुळे झालेल्या घटनांमध्ये 17 हून अधिक लोक बेपत्ता आहेत. राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या एका सदस्याचाही मृत्यू झाला आहे. कडप्पा जिल्ह्यातील चेयेरू नदीला शुक्रवारी आलेल्या पुरात 30 हून अधिक लोक वाहून गेले, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. तिरुपती शहरातील परिस्थिती अजूनही भीषण आहे आणि अनेक भाग पाण्याखाली गेले आहेत, तर तिरुमला टेकड्यांमध्ये परिस्थिती तुलनेने ठीक आहे, परंतु पावसामुळे भाविकांची गैरसोय झाली.
15 हजारांपेक्षा जास्त बेघर
तामिळनाडूतील विल्लुपुरम आणि कुड्डालोर जिल्हे थेनपेन्नई नदीच्या प्रवाहामुळे प्रभावित झाले आहेत. दोन्ही जिल्ह्यातील सुमारे 15,000 लोकांना मदत छावण्यांमध्ये ठेवण्यात आले आहे, तर विल्लुपुरममधील 18,500 हेक्टर शेतजमीन थेपनई नदीमुळे पाण्याखाली गेली आहे. महसूल आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री केकेएसएसआर रामचंद्रन यांनी सांगितले की, कृष्णगिरी आणि तिरुवन्नमलाई जिल्ह्यात गेल्या 24 तासांत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी बाधित भागाला भेट दिली आणि अधिकाऱ्यांना मदतकार्य जलद करण्याचे निर्देश दिले.
रेल्वे गाड्यांचे मार्ग बदलले
आंध्रप्रदेशात आलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. यामुळे रेल्वेने दोनशे गाड्या रद्द केल्या असून अनेक गाड्यांलचे मार्ग बदलले आहे. शनिवारी सायंकाळी पावसाचा जोर ओसरला परंतु लोकांना दिलासा मिळाला नाही. कारण अचानक आलेल्या पुरामध्ये अनेक गावे बुडाली. तिरुपती शहरातील स्थितीही अद्याप गंभर झाली आहे. शहराच्या अनेक भागात पाणी तुंबले आहे. दरम्यान, विजयवाड़ा मंडळाच्या नेल्लोर-पादुगुपाडू खंडात रेल्वे मार्गावर पाणी साचल्याने शनिवारी 10 एक्सप्रेस रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या. पावसामुळे पाच कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेचे 1,549 मकानांचे नुकसान झाले आहे तर 488 घरे जलमग्न झाले आहेत.